Wednesday, April 24, 2024
Homeनगरचोर्‍या, घरफोड्या रोखण्यासाठी 10 दुचाकींवरून गस्त

चोर्‍या, घरफोड्या रोखण्यासाठी 10 दुचाकींवरून गस्त

शहर पोलिसांचा उपक्रम : 40 कर्मचार्‍यांची खास नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरामध्ये चोर्‍या, दिवसा घरफोड्या, सोनसाखळी पळविणे, दुचाकी, मोबाईलची चोरी, यामध्ये वाढ झाल्याने शहर पोलीस हतबल झाले आहेत. वाढत्या चोर्‍यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलीस सरसावले आहे. शहरात 24 तास 10 दुचाकींवर 40 कर्मचार्‍यांची गस्त आता असणार आहे. सोमवारपासून या गस्तीला सुरुवात झाली.

- Advertisement -

दोन ते तीन महिन्यापासून शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी मोठ्या घरफोड्या, चोर्‍या, दिवसा घरफोड्या, दुचाकीवरून धूम स्टाईलने महिलांच्या गळातील दागिने ओरबडणे, पर्स पळविणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शहरातील नागरिक सुरक्षित राहिलेले नाहीत. दिवसा घर बंद करून बाहेर किंवा बाहेरगावी जाणे धोक्याचे झाले आहे. अलीकडच्या काळात कल्याण रोड, रेल्वेस्टेशन, बालिकाश्रम रोड, गुलमोहर रोड, सावेडीगाव, केडगाव परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहे.

मोबाईल चोरी, दुचाकी चोरीच्या दररोज चार ते पाच घटना घडत आहेत. कल्याण रोड, रेल्वेस्टेशन परिसरात दिवसा फ्लॅट फोडून लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. गुन्हेगारीचे मूळ शोधण्याची गरज असताना पोलिसांकडून ते होताना दिसत नाही. चोरीची कोणतीही घटना झाली तर नागरिक पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देतात; परंतु तपास लागत नाही. वाढत्या चोर्‍यामुळे शहरातील नागरिकांनी शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेऊन अनेकदा निवेदन दिले.

प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन मोटार परिवहन विभागाकडून 10 दुचाकी तयार करून घेतल्या आहेत. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता तेथे पाच दुचाकी, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत चार दुचाकी तर, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत एक अशा 10 दुचाकीवरून शहरात दररोज 24 तास गस्त असणार आहे. यासाठी तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील 20 कर्मचारी व मुख्यालयातील 20 कर्मचारी अशा 40 कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे.

चोरी करणार्‍या काही ठराविक टोळ्या शहरात सक्रीय आहेत. बाजारातून मोबाईल चोरणे, घरासमोरून दुचाकी चोरणे, अपार्टमेंटमध्ये पाळत ठेवून लोक फ्लॅट बंद करून बाहेर गेल्यावर ऐवज लंपास करणे, धूमस्टाईलने दागिने ओरबडणे अशा घटना वारंवार होत आहे. या घटना करणारे काही ठराविक चोरटे आहेत. त्यांचा बंदोबस्त केला तर अशा घटनांना आळा बसण्यात मदत होईल. मात्र, पोलिसांवर वाढत्या कामाच्या व्यापामुळे गुन्हेगारीचे मुळे शोधण्यात वेळ मिळत नाही. आता दुचाकीवरून 24 तास होणार्‍या गस्तीमुळे शहरात वावरणारे गुन्हेगार लक्षात येतील, असा विश्वास शहर पोलिसांना आहे.

शहरात 10 दुचाकींवरून 40 कर्मचार्‍यांची 24 तास गस्त असणार आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी शहर पोलीस प्रयत्न करत आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी राहत असलेल्या ठिकाणी, दुकान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. परगावी जाताना घरामध्ये रोख रक्कम, मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. तसेच, प्रत्येक सोसायटीमध्ये 24 तास वॉचमन ठेवावा.
– संदीप मिटके, शहर पोलीस उपअधीक्षक.

असे असेल बीट मार्शल
प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी मोटार परिवहन विभागाकडून गस्तीसाठी विशेष 10 दुचाकी तयार करून घेतल्या आहेत. पांढर्‍या रंगाच्या या दुचाकीला समोरून एक काच बसविण्यात आली आहे. या दुचाकीला ‘बीट मार्शल’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच, लाल व निळ्या रंगाचे दोन दिवे, सायरन बसविण्यात आला आहे. गस्तीवरील लोकेशनसाठी दुचाकीला जीपीएस बसविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या