घरफोड्यांतील अट्टल गुन्हेगारांना अटक

घरफोड्यांतील अट्टल गुन्हेगारांना अटक

नगर शहरासह आष्टी, पैठण तालुक्यांत केल्या चोर्‍या

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरामध्ये चोर्‍या, घरफोड्या करणार्‍या दोन अट्टल दरोडेखोरांना कोतवाली पोलिसांनी अंभोरा (ता. आष्टी) चेक पोस्ट नाक्यावर अटक केली. संतोष नंदू भोसले (वय- 19), काळू निलगिर्‍या भोसले (वय- 30 दोघे रा. वाळुंज पारगाव, ता. नगर) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

नगर शहरासह उपनगरांमध्ये चोर्‍या, घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 24 जून 2019 रोजी सुमित संतोष वर्मा (वय- 30 रा. माणिकनगर) यांचा चंदन इस्टेटमधील चंद्रमोती बंगाला फोडून 30 नव्या साड्या, टीव्ही चोरून नेला होता. वर्मा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी अंभोरा (ता. आष्टी) पोलीस ठाणे हद्दीत येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ व त्यांच्या पथकाने अंभोरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे व कर्मचार्‍यांच्या मदतीने अंभोरा चेक पोस्ट परिसरात सापळा लावला.

आरोपी येताच पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. गुन्ह्याबाबत विचारणा केली असता या गुन्ह्यासह कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत इतर तीन गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. या आरोपींविरोधात अंभोरा, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, पैठण पोलीस ठाण्यांत चोरी, घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. नगर शहरातील इतर चोरी, घरफोडी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता असून त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस नाईक गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, पोलीस शिपाई सुजय हिवाळे, भारत इंगळे, बापुसाहेब गोरे, योगेश चव्हाण, देवडे यांनी केली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com