शिक्षिकेची सतरा लाखांची फसवणूक
Featured

शिक्षिकेची सतरा लाखांची फसवणूक

Sarvmat Digital

रोहिदासजी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांनी नोकरीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 19 फिर्यादी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल होऊन फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. रोहिदासजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विश्वस्तांविरोधात फसवणुकीची आणखी एक फिर्याद भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

वृषाली गणेश होळकर-कुलट (रा. खातगाव टाकळी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, संस्थेचे सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, विजयनगर, भिंगार), सचिव अनिल तुळशीदास शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

होळकर यांच्या फिर्यादीमध्ये, आरोपींनी जुलै 2013 मध्ये रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीसाठी सात लाख रुपयांची मागणी केली. होळकर यांनी सात लाख रुपये दिले. अध्यक्ष व विश्वस्तांनी कायमस्वरूपी नोकरी न देता व दिलेले पैसे तसेच 31 जुलै 2013 ते 2016 पर्यंतचा पगार न देता 17 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

तसेच, फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली असता आरोपींनी त्यांना खोट्या केसमध्ये अडकवू व जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. होळकर यांनी भिंगार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी करत आहेत.

फसवणूकप्रकरणी जानेवारीमध्ये मी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते. पोलिसांनी माझ्याकडून तक्रार अर्ज घेतला व तो आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात येईल असे सांगितले. फिर्याद दाखल करून न घेतल्याने मी औरंगाबाद उच्च न्यायालयात फसवणुकीचे प्रकरण दाखल केले. न्यायालयात एक सुनावणी झाल्यानंतर भिंगार पोलिसांना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी माझी फिर्याद घेतली आहे.
– वृषाली होळकर-कुलट (फिर्यादी)

Deshdoot
www.deshdoot.com