15 हजार 552 शिक्षक देणार टीईटी
Featured

15 हजार 552 शिक्षक देणार टीईटी

Sarvmat Digital

तयारी पूर्ण : रविवारी परीक्षा, नगर शहरात

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीइटी) नगर शहरात रविवारी (दि. 19) 49 केंद्रावर पार पडणार आहे. यातील पेपर क्रमांक 1 साठी 8 हजार 27 तर पेपर 2 साठी 7 हजार 525 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली असून, नियोजनासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी 5 भरारी पथके नेमण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी दिली.

टीइटी ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येत असते. इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी या वर्गासाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडल, सर्व माध्यमाच्या अनुदानित-विनानुदानित, कायम विनानुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

उमेदवारांना परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरावे लागले. ही परीक्षा दोन भागात घेण्यात येणार आहे. त्यातील पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1 दरम्यान घेण्यात येईल. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी प्राथमिक शिक्षण स्तर माध्यमाचा पेपर होईल.

दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. त्यात मराठी, इंग्रजी, उर्दू उच्च प्राथमिक स्तर माध्यमाचा पेपर घेण्यात येणार आहे. मागील महिन्यात या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. दरवर्षी ही परीक्षा घेणे बंधनकारक आहे.

मागील महिन्यात परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना यामुळे दिलासा मिळाला. दरवर्षी परीक्षा परिषदेकडून डिसेंबर महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्यात येते. परीक्षेसाठी 5 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके परीक्षा केंद्रांना भेटी देतील. प्रत्येक केंद्रावर व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे.

अधिकारी कर्मचारी
पेपर 1- केंद्र 26, झोनल अधिकारी 6, केंद्रसंचालक 26, सहायक परिरक्षक 26, पर्यवेक्षक 74, समावेक्षक 336, लिपिक 52, शिपाई 104. पेपर 2- केंद्र 23, झोनल अधिकारी 6, केंद्रसंचालक 23, सहायक परिरक्षक 23, पर्यवेक्षक 69, समावेक्षक 317, लिपिक 46, शिपाई 92.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com