Wednesday, April 24, 2024
Homeनगरमास्तरांच्या निवडणुकीत दारूचा महापूर अन् मांसाहाराचा सुकाळ

मास्तरांच्या निवडणुकीत दारूचा महापूर अन् मांसाहाराचा सुकाळ

राहुरी- नुकत्याच झालेल्या माध्यमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत मास्तरांनी एखाद्या राजकीय निवडणुकीलाही फिके पाडणारे अवगुण प्रदर्शित केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. भावी पिढी घडविणार्‍या मास्तरांच्या निवडणुकीत सर्रास दारूचा महापूर आणि मांसाहाराचा सुकाळ झाल्याने राहुरी तालुक्यात दोन-तीन ठिकाणी झालेल्या ओल्या पाट्यार्ंची चर्चा आता रंगात आली आहे. या निवडणुकीच्या ओल्या पार्टीत दारूच्या महापुराबरोबरच तब्बल 200 किलो माशाच्या मांसाहाराचा समावेश होता. त्यामुळे ही निवडणूक आता टिकेचा विषय ठरली आहे.

एरवी प्राथमिक शिक्षक बँक असो वा इतर शिक्षक सोसायट्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळ तर अनेकदा टिकेचा विषय होतो. मात्र, माध्यमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत तर मास्तरांनी कहरच केला. राहुरीच्या डाव्या कालव्यानजिक असलेल्या व आरडगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या दारू-मटनाच्या पार्ट्या झाल्या. यात अनेक तर्राट झालेल्या मास्तरांना तर अक्षरशः उचलबांगडी करून घरी पोहोच करावे लागल्याची चर्चा होत आहे. तर काही मास्तरांना घरी जाण्याचे धाडसच होत नसल्याने त्यांनी हॉटेलच्या पाठीमागेच मुक्काम ठोकल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

वास्तविक शासनाने शिक्षकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी व भावीपिढीचे भवितव्य राखण्यासाठी भरघोस वेतन दिले आहे. मात्र, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासताना शिक्षणक्षेत्रालाही अवकळा आणण्याचे काम काही मास्तरांनी केले आहे. विद्यार्थी आणि समाजाला संस्काराचे धडे देणार्‍या मास्तरांनी खर्‍याअर्थाने या निवडणुका बिनविरोध केल्या असत्या तर गुरू आदर्श ठरले असते.

मात्र, गुरूपदाला गालबोट लावणार्‍या या निवडणुका आता कळीचा मुद्दा ठरल्या आहेत. दिवसेंदिवस मास्तरांच्या तर्‍हेवाईकपणामुळे शासन संचलित विद्यालयांना उतरती कळा लागत असताना त्या तुलनेत खासगी शाळा आता बाळसे धरू लागल्या आहेत. गुणवत्तेची घसरण आणि पटसंख्येला आलेली अवकळा पाहता शैक्षणिक क्षेत्र आता राजकारणाचे अड्डे होण्याचे संकेत मिळत आहेत.

मागील एका निवडणुकीत काही महिला शिक्षकांना पैठणीचे वाटप करण्यात आले. मात्र, रंग पसंत नसल्याने केवळ रंगावरूनच हमरीतुमरी झाल्याची चर्चा आहे. पूर्वीचे शिक्षक अल्पवेतनावर काम करीत असताना त्यांच्याविषयी समाजमनात आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा आदर होता. आता मात्र, हा आदर कमी झाला असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या