Friday, April 26, 2024
Homeनगरवैफल्यातून शिक्षक बँकेवर बेताल आरोप

वैफल्यातून शिक्षक बँकेवर बेताल आरोप

संतोष दुसुंगे : स्वतःची विश्वासार्हता तपासून पाहण्याचा सल्ला

अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभरापासून शिक्षक बँकेचा सभासद हिताचा कारभार सुरू आहे. वाहन व गृह कर्ज योजना, ठेवीवरील व्याजाबाबत पोटनियम दुरुस्ती, सोनेतारण योजना, सातत्याने कमी केलेला कर्ज व्याजदर, सावित्रीच्या लेकी पुरस्कार कार्यक्रमास लाभलेला प्रतिसाद, संचालक मंडळाच्या कामांविषयी शिक्षक सभासदांत वाढत चाललेली विश्वासार्हता यामुळे संजय शेळके यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. या अस्वस्थतेतून शेळके शिक्षक बँकेवर बेताल आरोप करत असल्याचे चेअरमन संतोष दुसुंगे व व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या घड्याळ खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष संजय शळके यांनी केला होता. यामुळे शिक्षक बँकेचे राजकारण तापले आहे. बँंकेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, माजी चेअरमन आणि संचालकांनी शेळके यांचा समाचार घेतला आहे. रावसाहेब रोहोकले यांच्या निवृत्तीनंतर वर्षभरात बँकेमध्ये गुरुमाऊली मंडळाच्या ध्येय धोरणाप्रमाणेच कारभार सुरू आहे. सभासदहिताला सातत्याने प्राधान्य देऊन अत्यंत काटकसरीचा कारभार सुरू आहे.

मात्र, ज्यांनी स्वार्थासाठी शिक्षक संघ फोडला आणि दुसर्‍या संघटनेत जाऊन पदे मिळवली. त्यांनी पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता तपासून घेण्याची गरज आहे. शेळके यांचा इतिहास पाहता कोणत्याही एका संघटनेत, मंडळात ते रमत नसल्याचा आरोप चेअमरन दुसंगे यांनी केला.

शिक्षक बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त सभासदांना घड्याळ भेट देण्याचा निर्णय रोहोकले यांच्या चेअरमनपदाच्या काळातच झालेला आहे. घड्याळ खरेदीची प्रक्रियाही वृत्तपत्रात जाहिरात देऊऩ टेंडरद्वारे पारदर्शक करण्यात आली आहे. घड्याळ खरेदी प्रक्रिया ही कंपनी ते बँक अशी झालेली आहे. यामध्ये कोणीही मध्यस्थ अथवा दलाल नसल्याने घड्याळ खरेदीत बचत झाली.

परंतु ज्यांना सतत भ्रष्टाचार करण्याची सवय आहे, त्यांना यातही भ्रष्टाचार दिसत आहे. घड्याळ खरेदीचा निर्णय रोहोकले यांच्या काळातच झालेला असून तशी प्रोसिडिंगला नोंदही आहे. त्यावेळी ठेव पावती देण्याचा कोणताही निर्णय अथवा चर्चा झालेली नाही. मात्र, आता खोटे सांगून सभासदांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी सांगितले.

शिक्षक संघाच्या सासवड अधिवेशनासाठी जिल्हाभरातून पैसे गोळा केले. तसेच शिर्डी, ऐरोली अधिवेशनाच्या हिशोबाचे काय केले? श्रीगोंदा तालुक्यातून एक लाख रुपयांचा भरणा सासवड अधिवेशनाच्या वेळी संजय शेळके यांच्याकडे दिला आहे. त्यांनी राज्याला कोणतीच रक्कम भरली नाही. हे पैसे त्यांना परत मागितले, परंतु ते देण्याऐवजी खोटे करणे चुकीचे असल्याचे श्रीगोंद्याचे संचालक अविनाश निंभोरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या