संगमनेर : व्यक्तीचा मृत्यू, निमोणकर हादरले

संगमनेर : व्यक्तीचा मृत्यू, निमोणकर हादरले

तळेगाव दिघे (वार्ताहर)– संगमनेर तालुक्यातील निमोण येथे यापूर्वीच करोनाने एकाचा मृत्यू झालेला असतानाच काल रविवारी आणखी एका व्यक्तीचा नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे निमोण येथील करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या दोन, तर तालुक्यातील मृत्यूची संख्या तीन झाली आहे. करोनाने रविवारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या निमोण येथील त्या व्यक्तीच्या आईला व पत्नीलाही करोनाची बाधा झाली असून त्यांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. दरम्यान यापूर्वीच सदर करोना बाधितांच्या संपर्कातील 21 व्यक्तींचे करोना अहवाल निगेटीव्ह आले होते.

दरम्यान रविवारी सकाळी निमोण येथील एकाचा करोनाने मृत्यू झाला. करोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर निमोण येथे 14 दिवसांसाठी लॉकडाऊन सुरू आहे. गावांतर्गतचे व बाहेरून येणारे रस्तेही रोखण्यात आले आहेत. करोना बाधित व्यक्ती राहत असलेला परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संगमनेर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी गावात भेटी देऊन उपाययोजनांचा आढावा घेत संबंधितांना दक्षतेच्या सूचना दिल्या.

ग्रामपंचायत मार्फत गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून सहा आरोग्य पथका मार्फत दररोज आरोग्य सर्व्हेक्षण सुरू आहे. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी निमोण ग्रामपंचायतीतर्फे प्रभारी सरपंच दगडू घुगे, माजी सरपंच संदीप देशमुख, व ग्रामविकास अधिकारी एस. वाय. मिसाळ, कामगार तलाठी श्रीमती पन्हाड, बबन सांगळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. निमोण गावात ग्रामपंचायत, महसूल, आरोग्य व पोलीस कर्मचारी लॉकडाऊन दरम्यान करोना संसर्ग रोखण्यासाठी परिश्रम घेत आहेत. करोनाने आतापर्यंत निमोण गावातील दोघांचे बळी घेतल्याने निमोण गावात सध्या सन्नाटा पसरला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com