सत्ताधारी-विरोधकांच्या उपस्थितीत अंतर्गत जलवाहिन्यांचा नारळ फुटला
Featured

सत्ताधारी-विरोधकांच्या उपस्थितीत अंतर्गत जलवाहिन्यांचा नारळ फुटला

Sarvmat Digital

टाकळीभानच्या पाणीटंचाईचे राजकारण तापले ; दोन गटांत आरोप-प्रत्यारोप

टाकळीभान (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील टाकळीभान गावाला टेलटँकचे वरदान असले तरी नागरिकांना कायमच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात सर्वाधिक जलस्त्रोत असले तरी नागरिकांच्या घशाला कायम कोरड पडलेली असते. सत्ताधारी गटाकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन होत नसल्याचा आरोप विरोधी गटाकडून होत आहे याचा प्रत्यय प्रभाग तीन मधील पूरक जलवाहिनीच्या शुभारंभ प्रसंगी दिसून आला.

टाकळीभान येथे पाणीटंचाई हा नित्याचा विषय झाला आहे. टाकळीभान टेलटँक परिसरातच ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याच्या दोन योजना आहेत. टेलटँक, बंधारे व ओढे नाले तुडूंब असतानाही पाणीपुरवठ्याचे मात्र नेहमीच तीन तेरा वाजलेले आहेत. दै. सार्वमतने याबाबत नेहमीच आवाज उठवलेला आहे. नुकताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयुर पटारे यांनी पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडवावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

मुबलक पाणीसाठा असतानाही गावाला कुठे चार दिवसाला, कुठे आठ दिवसाला तर वाड्या वस्त्यांना सणावाराला पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायत सत्ताधारी गटाचे पाणीपुरवठा विभागावर व अनाधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप विरोधी गटाकडून प्रथमच केला जाऊ लागला आहे.

नवीन प्रभाग रचनेतील प्रभाग दोन मधील नागरिकांना पाणी टंचाई जाणवत असल्याने गेल्या काही दिवस ओरड होत होती. त्यामुळे सांस्कृतिक भवन ते येवले यांच्या घरापर्यंत 300 फूट लांबीची पूरक जलवाहिनी व वाडगाव रोडवरील 600 फूट पूरक जलवाहिनी टाकण्याचा शुभारंभ सत्ताधारी व विरोधी गटाच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दोन्ही गट आमने सामने आल्याने गावच्या पाणी टंचाईवर बरेच आरोप प्रत्यारोप झाले. मुख्य जलवाहिनीला असलेल्या नळजोडण्या काढण्यास सत्ताधारी असमर्थ ठरत असल्याने गावाला पाणी टंचाई होत आहे.

मात्र सत्ताधारी गट त्या अनधिकृत नळजोडण्या तोडण्याची हिंमत दाखवत नाही. तर सत्ताधारी गटाकडून राजकारणासाठी विरोधी सदस्य अनधिकृत नळजोडण्या देत असल्याने पाणीटंचाई जाणवत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सामाजिक अंतराचा नियम पाळत दोन्ही गटांकडून पूरक पाणी योजनेचा शुभारंभ पार पडला. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, ज्ञानदेव साळुंके, राहुल पटारे, नारायण काळे, ग्रा.पं.सदस्य कान्होबा खंडागळे, भारत भवार, अविनाश लोखंडे, दत्तात्रय मगर, सुनील बोडखे, शिवाजी धुमाळ, गणेश कोकणे, सुदाम भालेराव, ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव, उपस्थित होते.

प्रभाग तीनचे सदस्य नियोजन न करता जलवाहिन्या टाकीत आहेत. त्यामुळे फाट्यांचे प्रमाण वाढून अनधिकृत नळजोडण्या देत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तीन महिन्यांत जुना जलकुंभ पाडून नवीन जलकुंभ बांधण्यात येईल. अनधिकृत एकापेक्षा जास्त नळजोडण्या होत असल्याने जलवाहिनीच्या टेलला पाणी जात नाही. अनधिकृत नळजोडण्या थांबवण्यासाठी पुढील काळात लोखंडी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

– नानासाहेब पवार, ग्रामपंचायत मार्गदर्शक.

टाकळीभानमध्ये भविष्यात ‘एक कुटुंब एक नळ’ ही संकल्पना राबवावी लागणार आहे. पाणी चोरी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मुबलक पाणी असूनही पाणी टंचाईची समस्या सुरुच राहणार आहे. त्यासाठी कठोर भूमिका घेऊन पाणी चोरांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तरच गाव पाणीटंचाई मुक्त होणार आहे.
– कान्होबा खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य, टाकळीभान.

पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र विजेचे भारनियमन व नेहमीचा लपंडाव यामुळे पाणीपुरवठा योजनेला अडचणी येऊन पाणीटंचाईची समस्या जाणवते. पाणीपुरवठा योजनेसाठी एक्सप्रेस फिडरने वीज घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ सहा तास वीज उपलब्ध असल्याने पाणीपुरवठा अपुरा होऊन टंचाई होते.
– आर. एफ. जाधव, ग्रामविकास अधिकारी, टाकळीभान.

मुख्य जलवाहिनीला अनधिकृत नळ जोडण्या जोडल्या जात असताना ग्रामपंचायतीने हरकत घेतली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे. सत्ताधारी कठोर भूमिका घेत नसल्याने मुख्य जलवाहिनीतून पाणी उपसा सुरुच आहे. केवळ नवीन जलवाहिन्या टाकून पाणीटंचाईची समस्या संपणार नाही. त्यासाठी मुख्य जलवाहिनीचे पाणी थेट गावात आणले पाहिजे.
– ज्ञानदेव साळुंके, माजी चेअरमन, अशोक कारखाना.

Deshdoot
www.deshdoot.com