टाकळीभान टेलटँकचा नवा विक्रम; फेब्रुवारी अखेरही काठोकाठ !

टाकळीभान टेलटँकचा नवा विक्रम; फेब्रुवारी अखेरही काठोकाठ !

यंदाचा उन्हाळा शेती व पाणीपुरवठा योजनांसाठी जाणार सुखकर

टाकळीभान (वार्ताहर)- टाकळीभान पंचक्रोशिला वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटँकने यंदा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरी टेलटँक पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे परिसराचा उन्हाळा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सुखकर जाणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दिवंगत माजी मंत्री गोविंदराव आदिक यांनी 1972 च्या दुष्काळात नागरिकांच्या हाताला काम देण्यासाठी या टेलटँकचे काम हाती घेतले होते. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत या टेलटँकला नसल्याने पावसाळ्यात भंडारदरा धरणातून सोडण्यात येणार्‍या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून हा 197 दलघफु. क्षमतेचा टेलटँक भरण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.

कालव्याद्वारे नेवासा तालुक्यातील घोगरगाव व टाकळीभानचे सुमारे 1500 हेक्टरचे सिंचन याद्वारे केले जाते तर परिसरातील खिर्डी, वांगी, गुजरवाडी, भोकर, कारवाडी व पाचेगावच्या काही भागाला या टेलटँकच्या पाझराचा फायदा होतो. त्यामुळे या पट्ट्यातील शेती फुलविण्यास टेलटँकचे मोठे वरदान आहे. आपवादात्मक काही वर्षे सोडली तर टेलटँक आजपर्यंत या परिसरातील शेतीसाठी वरदानच ठरलेला आहे.
दरवर्षी साधारणपणे खरीप हंगामातील दोन आवर्तने टेलटँकच्या कालव्याद्वारे सोडली जातात. तर मार्च महिन्यातही एक उन्हाळी आवर्तन पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध असल्यास केले जाते.

या प्रत्येक आवर्तनाचा कालावधी 30 ते 35 दिवसांचा असल्याने सुमारे शंभर दिवस आवर्तन सुरू असते. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात येथील अनेक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत येऊन पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊन त्याचे खापर जलसंपदा विभागावर फोडले जाते व जलसपदा विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याचे बेलपिंपळगाव व कारेगाव येथील जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी नियोजन केल्याने परिसरात पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात जलसंपदाने घेतलेल्या खरिपाच्या शेती आवर्तनाला शेतकर्‍यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आवर्तन काळात होणारे वादविवाद झालेले नाहीत.

त्याचबरोबर खरिपाच्या आवर्तनाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाचल्याने त्याचा उन्हाळ आवर्तनासाठी उपयोग होणार आहे. पाण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली गेली नसल्याने टेलटँकचा पाणी साठाही पूर्ण क्षमतेने शिल्लक आहे.

टेलटँकच्या निर्मितीनंतर प्रथमच टेलटँक पूणर्र् क्षमतेने भरलेला असतानाही खरीप पिकांसाठी शेतकर्‍यांकडून पाण्याची मागणी झालेली नसल्याने फेब्रुवारी महिना संपत आला असला तरी टँकमध्ये 197 दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. हा एक विक्रम झालेला आहे.

जलसंपदा विभागाचे बेलपिंपळगाव शाखेचे शाखा अभियंता महेश शेळके, कारेगावचे तत्कालीन शाखा अभियंता अशोक भोंगळ, कालवा निरीक्षक बाळासाहेब जपे, बाळासाहेब कोकणे यांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे टेलटँक पूर्ण क्षमतेने काठोकाठ भरलेला असल्याने यंदाचा उन्हाळा शेतीसाठी आणि पाणी पुरवठा योजनांसाठी सुखकर जाणार हे निश्चित आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com