Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीभान ग्रामपंचायतीच्या प्रभाग आरक्षण सोडतीत गोंधळ

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या प्रभाग आरक्षण सोडतीत गोंधळ

आरक्षणाचा चेंडू तहसिलदारांच्या कोर्टात

टाकळीभान (वार्ताहर)- टाकळीभान ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याने प्रभागानुसार सदस्यांचे आरक्षण टाकण्यासाठी नायब तहसीलदार ए.वाय. उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगार तलाठी यांनी अनु. जातीच्या मतदारांची संख्या चुकीची दर्शवल्याने या सोडतीमध्ये झालेल्या गोंधळामुळे सोडत जाहीर न करताच उगले यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे आरक्षणाचा चेंडू आता तहसीलदारांच्या कोर्टात गेला आहे.

- Advertisement -

बैठकीसाठी कामगार तलाठी अरुण हिवाळे, मंडलाधिकारी रोहिणी आघाव, ग्रा.वि.अधिकारी आर.एफ. जाधव, माजी सभापती नानासाहेब पवार, माजी सरपंच मंजाबापू थोरात प्रमुख उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे प्रभागानुसार आरक्षण सोडत टाकण्यासाठी नायब तहसीलदार ए.वाय.उगले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. सुरुवातीलाच अनु. जमातीचे आरक्षण प्रभाग दोन मध्ये लोकसंख्येच्या आधारे टाकण्याचे नायब तहसीलदार उगले यांनी जाहीर करताच ग्रा.पं.सदस्य कान्हा खंडागळे व भाजपाचे नारायण काळे यांनी आक्षेप घेऊन तलाठी यांनी प्रभाग 2 मध्ये दर्शवलेली अनु.जमाती मतदारांची संख्या चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर हे आरक्षण बदलून प्रभाग 6 मध्ये टाकले. त्या प्रभागातही मतदार संख्या चुकीची दर्शवल्याचा आक्षेप भारत भवार यांनी घेतल्याने ते आरक्षण प्रभाग 5 मध्ये टाकण्यात आले. अनु. जातीच्या 4 जागेच्या आरक्षणावरूनही गोंधळ झाल्याने निवडणूक अधिनियमातील तरतुदींना फाटा देऊन प्रभाग 1, 2, 4, 6 मध्ये टाकण्यात आले. यावरूनही चांगलाच गदारोळ झाला. ना.मा.प्रवर्गच्या 5 जागेचे आरक्षण टाकण्यावरूनही चांगलाच गोंधळ झाला. या गोंधळातच सर्वसाधारण प्रवर्गाच्या 3 महिला व 4 पुरुष आरक्षण टाकण्यावरूनही उपस्थितांपैकी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. नायब तहसीलदार उगले यांनी प्रभाग 1 मधून अनु.जाती स्त्री, ना.मा.प्र.पुरुष, सर्ववसाधारण स्त्री, प्रभाग 2 मधून अनु.जाती स्त्री, ना.मा.प्र.स्त्री व सर्वसाधारण स्त्री असे तिन्ही जागांसाठी महिलांचे आरक्षण टाकले. प्रभाग 3 साठी दोन जागा असल्याने दोन्ही जागा सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित केल्या.

प्रभाग 4 मध्ये अनु.जाती स्त्री, ना.मा.प्र.पुरुष, सर्वसाधारण पुरुष, प्रभाग 5 मध्ये अनु.जमाती स्त्री, ना.मा.प्र. स्त्री, सर्वसाधारण पुरुष तर प्रभाग 6 मध्ये अनु. जाती पुरुष, ना.मा.प्र.स्त्री व सर्वसाधारण स्त्री अशी आरक्षण सोडत काढली. उपस्थित बहुसंख्य नागरिकांना ही सोडत मान्य नसल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतला तर काही नागरिकांनी ही सोडत प्रक्रीया मान्य असल्याने आरक्षण सोडतीची नक्कल मिळण्याची लेखी मागणी केली. मात्र, पिठासिन अधिकारी नायब तहसीलदार यांनी हे आरक्षण जाहीर न करता बैठकीतून निघून जाणे पसंत केल्याने आरक्षण सोडतीचा चेंडू थेट तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या कोर्टात गेला आहे.

यावेळी राजेंद्र कोकणे, पाराजी पटारे, दादासाहेब कोकणे, अबासाहेब रणनवरे, कान्होबा खंडागळे, एकनाथ लोखंडे, प्रकाश धुमाळ, चित्रसेन रणनवरे, बापु शिंदे, अविनाश लोखंडे, विकास मगर, मोहन रणनवरे, नवाज शेख, रमेश पटारे, विलास दाभाडे, राजेंद्र आदिक, बाबासाहेब दाभाडे, राजू रणनवरे, अण्णासाहेब दाभाडे, दीपक पवार, अप्पा रणनवरे, अनिल बोडखे, संजय रणनवरे, बंडू कोकणे, तुकाराम बोडखे, प्रशांत थोरात, सुनील बोडखे, दिलीप पवार, शिवाजी धुमाळ, दत्तोबा मगर, प्रकाश दाभाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज झालेली प्रभाग आरक्षण सोडत ही घटनात्मक नियमांची पायमल्ली करणारी आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा यासाठी विचार करण्यात आलेला नाही. विशिष्ट लोकांच्या मर्जीनुसार व त्यांच्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. त्यामुळे लोकशाहीची नितीमूल्ये पाळून ही आरक्षण सोडत रद्द करून पुन्हा सोडत काढण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भारत भवार, भाऊसाहेब पवार, नवाज शेख, विलास दाभाडे यांनी पिठासीन अधिकारी उगले यांना दिले.

प्रभागातील आरक्षित जागेचे मतदार संख्येनुसार आरक्षण टाकताना कामगार तलाठी यांनी चुकीची आकडेवारी दर्शवली आहे. अनु. जमातीचे प्रभाग 6 मध्ये 100 मतदार असल्याचे त्यांनी दर्शवले आहे. ही आकडेवारी फसवी व दिशाभूल करणारी असल्याने त्यांनी प्रभाग 6 मध्ये अनु. जमातीचे 100 मतदार असल्याचे सिध्द केल्यास त्यांना रोख एक लाखाचे बक्षिस मी जाहीर करतो, असे आव्हान प्रभाग 6 चे विद्यमान ग्रा.पं.सदस्य भारत भवार यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या