Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीभान प्रभाग आरक्षणामुळे ‘कही खुशी कही गम’

टाकळीभान प्रभाग आरक्षणामुळे ‘कही खुशी कही गम’

विद्यमान सदस्यांची भागमभाग सुरू

टाकळीभान (वार्ताहर) – टाकळीभान ग्रामपंचायतीच्या आगामी होऊ घातलेल्या सदस्यांच्या निवडीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झालेले आहे. या आरक्षणात काही विद्यमान सदस्यांच्या संधी हुकल्याने त्यांना सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे किंवा अन्य प्रभागातून उमेदवारी करावी लागणार असल्याने ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था विद्यमान सदस्यांची झाली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय प्रतिष्ठेच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा पंचवर्षिक कालावधी 31 ऑगस्ट 2020 रोजी संपत आहे. त्यादृष्टीने महसूल विभागाने निवडणूक पूर्वतयारी सुरु केली आहे. मतदार याद्या, प्रभाग रचना पूर्ण करुन 7 फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रभाग 1 चे विद्यमान सदस्य राजेंद्र रणनवरे यांना अनु.जाती पुरुष जागा नसल्याने त्यांचा या प्रभागातून पत्ता कट झाला आहे. त्यांना प्रभाग 2 किंवा 5 मध्ये जावे लागेल. तर अविनाश लोखंडे यांनाही नामाप्र पुरुष जागा नसल्याने नामाप्र स्त्री या जागेवर सौभाग्यवतीला संधी द्यावी लागेल तर सुरेखा पवार सुरक्षित आहेत.

प्रभाग 2 मध्ये वैशाली कोकणे सर्वसाधारण जागेवर सुरक्षित आहेत. उपसरपंच पाराजी पटारेही सुरक्षित आहेत. प्रभाग 3 मधून कान्होबा खंडागळे यांना सर्वसाधारण जागा नसली तरी नामाप्र पुरुष या जागेवर ते निवडणूक लढवू शकतात किंवा पत्नीला सर्वसाधारण महिला म्हणून निवडणूक रिंगणात उतरवु शकतात. तर सरोजिनी कापसे (नामाप्र महिला) व वर्षा गाढे (अनु.जाती महिला) यांना आन्य प्रभाग शोधावा लागणार आहे. प्रभाग 4 मधून अप्पासाहेब रणनवरे यांना अर्धचंद्र मिळाला असून या प्रभागातून त्यांना सौभाग्यवतींना पुढे करावे लागेल किंवा अन्य प्रभागाची चाचपणी करावी लागेल.

सुरेश माळी यांनाही या प्रभागात आरक्षण राहिले नसल्याने प्रभाग 5 मधून त्यांना सौभाग्यवतीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागतील तर सर्वसाधारण महिला जागेवर निवडून आलेल्या नंदा मागर यांनाही जागा राहिली नसल्याने त्यांना आन्य प्रभागासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रभाग 5 मधून विद्यमान सरपंच सर्वसाधारण पुरुष जागेवर निवडून आल्या होत्या. आताही सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने त्या सुरक्षित आहेत. शितल रणनवरे यांनाही आरक्षण पडले नसल्याने त्यांचे पती या प्रभागातून उमेदवारी करु शकतात.

तर याच प्रभागातील ताराबाई शिंदे (नामाप्र स्त्री) यांचीही या प्रभागातून उमेदवारीची संधी हुकली असली तरी खुल्या महिला जागेतून त्या निवडणूक लढवण्यास पात्र आहेत. प्रभाग 6 मधून भारत भवार हे सुरक्षित आहेत. रुपाली दाभाडे यांची संधी हुकली असली तरी त्यांचे पती नामाप पुरुष या जागेवर हक्क सांगू शकतात. तर सविता बनकर यांनाही सर्वसाधारण महिला जागा नसल्याने त्यांची संधी हुकली असली तरी त्यांचे पती नामाप्र पुरुष जागेवर उमेद्वारीस पात्र आहेत.

एकूणच या जाहीर झालेल्या आरक्षणात काही सदस्यांना नारळ मिळाला आहे. तर काहींना सौभाग्यवतींना संधी द्यावी लागणार आहे. काही प्रभागात पतिराजांना संधी मिळणार आहे तर काही इच्छुकांना अन्य प्रभागाचा शोध घेऊन चाचपणी करावी लागणार आहे. त्यामुळे या जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कही खुशी कही गम अशी परीस्थिती निर्माण झाल्याने काही सदस्यांनी व इच्छुकांनी हरकती घेतल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या