26 तबलिगी विदेशी नागरिक पारनेरच्या कारागृहात
Featured

26 तबलिगी विदेशी नागरिक पारनेरच्या कारागृहात

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नगरमध्ये दाखल झालेल्या 26 परदेशींना शुक्रवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी पारनेरच्या कारागृहात करण्यात आली आहे.

कोठडीत ठेवण्यापूर्वी या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सर्व परदेशी नागरिकांना कारागृहातील दोन बराकीत ठेवण्यात आले असल्याचे पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. त्यांच्यापासून इतर आरोपींना वेगळे ठेवण्यात आले आहे. इतर आरोपींना कोणताही धोका नसल्याचे निरीक्षक गवळी यांनी सांगितले.

सर्व परदेशी नागरिक नवी दिल्ली येथे झालेल्या मरकज कार्यक्रमातून आलेले होते. त्यांनी पर्यटनच्या नावाने व्हीसा त्याचा वापर धर्मप्रसार करण्यासाठी केल्याच्या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता या 26 परदेशी तबलिगींना आधी सात दिवसांची पोलीस कोठडी व नंतर आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मात्र, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नगरच्या कारागृहात न ठेवता पारनेरच्या कारागृहात रवाना केले आहे. या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते आणि त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात काही जण पॉझिटीव्हही आढळले होते. क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, 26 परदेशी नागरिकांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज (रविवार) सुनावणी होणार असल्याचे समजले.

Deshdoot
www.deshdoot.com