‘तबलिग’शी संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोनाची चाचणी करावी
Featured

‘तबलिग’शी संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोनाची चाचणी करावी

Sarvmat Digital

देवळाली प्रवरा मुुस्लिम पंच कमिटीचे आवाहन

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- ‘प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या तबलिग जमात अथवा इतर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग आला असल्यास किंवा अशा सहभाग आलेल्या व्यक्तींशी आपला संपर्क आला असल्यास त्वरीत आपली कोरोनाविषयक चाचणी जवळच्या शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधून करावी, असे आवाहन देवळाली प्रवरा मुस्लिम पंच कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, देशभरात सध्या कोरोना आजाराने थैमान घातले आहे. तबलिग जमातीच्या मुख्यालय असलेल्या दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमातून या रोगाचा मोठा प्रसार झाल्याचे चित्र आज सर्वत्र तयार होत आहे.त्या अनुषंगाने या लोकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क आलेल्या सर्व समाज बांधवांनी न घाबरता पुढे येण्याची गरज आहे. स्वतःची तपासणी करून घ्यावी. त्यामुळे कुणाला बाधा झाली असेल तर त्यावर उपचार करणे करणे शक्य होईल. उपचाराने या आजारावर मात केली जाऊ शकते.

इस्लाम धर्म शांततेची शिकवण देतो, कोणत्याही प्रकारे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी मुस्लिम समाजाने घ्यावी. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. धार्मिक गोष्टी पाळण्याची ही वेळ नाही! तसेच धार्मिक इगो पाळण्याचीही तर ही अजिबात वेळ नाही! निष्काळजीपणा करणार्‍या मूठभर लोकांमुळे सर्वांनाच टिकेचे धनी व्हावे लागते, याचेही भान ठेवण्याचे आवाहन केले आहे.

लॉकडाऊनचे नियम सर्वांनी पाळावे, अफवा पसरवू नये, समाजातील अशिक्षित लोकांचे प्रबोधन करावे, सर्व समाजातील हातावर पोट असणार्‍या लोकांना आपल्या परीने मदत करावी, उलट कोणी पालन न करताना आढळून आल्यास त्याला ताकीद देऊन आपल्या रक्षणासाठी रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन देवळाली प्रवरा मुस्लिम पंच कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करून इतरांच्या आरोग्याला बाधा पोहोचविणार्‍या विरूध्द प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com