Wednesday, April 24, 2024
Homeनगरपरस्पर केलेली फवारणी सुवेंद्र गांधी यांच्या अंगलट

परस्पर केलेली फवारणी सुवेंद्र गांधी यांच्या अंगलट

महापालिकेची परवानगी नसल्याने गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेकडून परवानगी नसतानाही शहरात परस्पर औषध फवारणी करणारे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महापालिकेचे कीटक संहारक सीताराम शितोळे यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात औषध फवारणीसाठी राजकीय कार्यकर्ते, नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. खासगी व्यक्तींकडून सुरू असलेल्या औषध फवारणीमध्ये अवाजवी व बेसुमार औषध फवारणी झाल्यास नागरिकांसाठी ती अपायकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने या संदर्भात निर्णय घेऊन संबंधित महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेकडूनच औषध फवारणी केली जाईल, खासगी व्यक्ती, सोसायट्यांनी परस्पर औषध फवारणी करू नये, असे आदेश दिले आहेत.

महापालिकेनेही राजकीय नेत्यांना औषध फवारणीसाठी जंतूनाशकांचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. खासगी व्यक्तींना औषध फवारणी करू नये, असेही मनपा आयुक्तांनी सांगितले आहे. असे असतानाही शहरात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन औषध फवारणी करत असल्याने अशा व्यक्तींवर कारवाईचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते.

त्यानुसार कीटक संहारक शितोळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील गंजबाजार, कापडबाजार, पारशाखुंट, जुना बाजार येथे सुवेंद्र गांधी व त्यांच्या दोन अनोळखी सहकार्‍यांनी महापालिकेची परवानगी नसताना औषध फवारणी केली. त्यामुळे हा परिसर निर्जंतूक झाल्याचा चुकीचा संदेश नागरिकांमध्ये गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार पोलिस ठाण्यात भादवि कलम 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या