शिर्डीतील संशयित महिलेला उपचारासाठी नगरला हलविले

शिर्डीतील संशयित महिलेला उपचारासाठी नगरला हलविले

राहत असलेली गल्ली रहिवाशियांकडून सील, औषध फवारणी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरातील एका नगरमध्ये राहाणार्‍या 60 वर्षीय महिलेस कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने सदर संशयित महिलेला तपासणीसाठी प्रशासनाने तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून लक्ष्मीनगरमध्ये रहिवाशांनी अंतर्गत गल्ली स्वयंस्फूर्तीने सील केल्या आहेत. दरम्यान, घटनेनंतर तातडीने याठिकाणी औषध फवारणी करण्यात आली असून परिसर स्वच्छ केला आहे.

दरम्यान, शिर्डी शहरातील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या परिसरातील 60 वर्षीय महिला एक महिन्यापूर्वी कोल्हार येथे गेली होती. सदरील महिला दोन दिवसांपूर्वी शिर्डीत आपल्या घरी परतली त्यानंतर तिला खोकला, ताप, सर्दी असल्याने तिने सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले तसेच शनिवारी साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयात उपचार घेतले आहेत. मात्र तिला कोरोना सदृश लक्षणे आढळून आले असून याप्रकरणी शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन यांच्याशी तात्काळ शासकीय अधिकारी यांनी संपर्क साधून माहिती घेतली असता राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोकुळ घोगरे यांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय अधिकारी भिंगारदिवे यांनी सदर महिलेस 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी रवाना केले आहे.

यावेळी नगरपंचायतचे नवनाथ गोंदकर, श्री लासूरे, पोलीस उपनिरीक्षक श्री तापकीर, पो.काँ. शिंदे आदी उपस्थित होते.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गोकुळ घोगरे यांनी लक्ष्मीनगरमधील नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.घटनेनंतर येथील सर्व रहिवाशांनी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन यांच्याशी संपर्क करून लक्ष्मीनगरमधील अंतर्गत गल्ली सील केल्या आहेत. त्याचप्रमाणे महिला राहात असलेल्या ठिकाणचा परिसर नगरपंचायतच्या आरोग्य विभागामार्फत औषध फवारणी करण्यात आली असली तरी मात्र शिर्डीकरांची धकधक वाढली आहे.

शिर्डीत तालुक्यातील पन्नास पेक्षा जास्त व्यक्तींना अगोदरच चौदा दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.त्यामुळे शिर्डीकरांची धकधक वाढली असून यामध्ये खुद्द शहरातील गजबजलेल्या वसाहतीत एका महिलेला संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने या महिलेचा अहवाल काय येतो याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com