सुरेश गिर्‍हे खूनप्रकरणी रवी शेटे, विजय खर्डे यांच्यासह सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

सुरेश गिर्‍हे खूनप्रकरणी रवी शेटे, विजय खर्डे यांच्यासह सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

आरोपी फरारः पोलीस पथके आरोपीच्या शोधार्थ रवाना

कोपरगाव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश शामराव गिर्‍हे यांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी संवत्सर रामवाडी येथील संशयित आरोपी रवी आप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यांच्यासह अनोळखी चार अशा सहा जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी पसार असून पोलिसांनी तपासासाठी पाच पथके विविध ठिकाणी रवाना केली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात सहा वर्षांपूर्वी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत संवत्सर चौफुलीवर वाळूचोरांच्या दोन टोळ्यांत हाणामारी होऊन त्यात भोजडे येथील तरुण बंटी शिनगर याची हत्या करण्यात आली होती. शिनगर याच्या हत्येत संवत्सर येथील रवी आप्पासाहेब शेटे हा आरोपी आहे. त्याचा गिर्‍हेच्या हत्येशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.

आरोपी रवी शेटे अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपारही केले होते. तेव्हापासून शेटे फरार असून त्याचे व व भोजडे येथील हत्या झालेला सुरेश गिर्‍हे यांचे वाळू व्यवसायातून बिनसले होते. रवी शेटे अनेक दिवसांपासून मयत सुरेश गिर्‍हे याच्या मागावर होता. त्यातूनच रविवार दि.15 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घरी आला असताना त्याच्या पाळतीवर असलेल्या काही गुन्हेगारांनी त्यास चहा पितानाच त्याच्या भोजडे चौकी येथील घरी गाठले व त्याने आरोपीना ओळखले व तो घरा शेजारच्या मका पिकात मागील बाजूने आपला जीव वाचविण्यासाठी पळत असताना त्यावर मागून हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या.

काही हल्लेखोरांनी तलवारीने छातीवर पुढील बाजूने वार करून त्यास जागीच ठार केले असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलिसानी दिली आहे. या गोळ्या काही घरावर व दरवाज्यावरही लागल्या होत्या. काही आरोपी पुढील दरवाजाने तर काही आरोपी हे मागील बाजूने टपून बसलेले होते. पुढील बाजूने गोळीबार झाल्यावर सुरेश गिर्‍हे हा मागील बाजूने आपल्या नजीकच्या मका पिकात पळत असताना मागील दाराने हल्यासाठी टपून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यावर पिस्तुलातून गोळ्या घातल्या.

त्यात सुरेश गिर्‍हे हा खाली कोसळला असताना आरोपीनी तलवार व कोयत्याने पुन्हा छातीवर पुढील बाजूने अनेक वार केले व त्यात गिर्‍हे ठार झाल्याची खात्री पटताच तेथून मारुती स्वीफ्ट डिझायर व विनाक्रमांकाची एक बजाज पल्सर या दोन गाड्यानी वैजापूर रस्त्याने धूम ठोकली होती. या घटनेने कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्हा ढवळून निघाला आहे. रात्रीच प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते.

मयत तरुणांचे वडील शामराव भीमराव गिर्‍हे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु. र. नं.88/2020 भादंवि कलम 302,452,143,147,148,149 तसेच शस्र प्रतिबंध कलम कायदा कलम 3/25,27, 7/25, 4/25 अन्वये आरोपी रवी आप्पासाहेब शेटे व विजय खर्डे याच्या सह अन्य चार अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके करीत आहेत.

मयत सुरेश गिर्‍हे याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह वाळूचोरी, जुगार असे जवळपास 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. त्यात खंडणी, लूटमार, वाळूचोरी आदी गुन्हे दाखल आहेत. त्यास दोन वर्षे हद्दपार करण्यात आले होते. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. त्याचे शवविच्छेदन प्रवरा ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर तीन गोळ्या काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याचे पार्थिव गावी अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com