Friday, April 26, 2024
Homeनगरसुरत-हैदराबाद महामार्गासाठी चार तालुक्यांतील भूसंपादन

सुरत-हैदराबाद महामार्गासाठी चार तालुक्यांतील भूसंपादन

संगमनेर, राहाता, राहुरी, नगर तालुक्यांतील 46 गावांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – सुरत-नाशिक-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर तालुक्यातील गावातून जाणार आहे. यासाठी भूमीन अधिगृहण झाले आहे. हा महामार्ग ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट असून त्यांची आखणी करताना खासदार म्हणून आम्हाला विचारा अशी सूचना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महामार्ग विकास विभागाच्या अधिकार्‍यांना केली. यावेळी नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता दिवाण यांनी सुरत-नाशिक-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाबद्दल माहिती दिली.

- Advertisement -

केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेत खासदार सदाशिव लोखंडे आणि खा. डॉ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अधिकार्‍यांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी नॅशनल हायवेचे अभियंता दिवाण यांनी सुरत-नाशिक-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्ह्यातून हा महामार्ग संगमनेर तालुक्यातील 13 गावे, राहाता तालुक्यातील 5, राहुरी तालुक्यातील 19 आणि नगर तालुक्यातील 9 गावातून जाणार आहे.

यात राहुरी तालुक्यातील धानोरे, सोनगाव, तांदूळनेर, वडनेर, चिंचविहिरे, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, कृषी विद्यापीठाचा काही भाग, खंडाबे खु आणि बु, वांबोरी तर नगर तालुक्यातील मांजरसुंभे, पिंपळगाव माळवी, पोखर्डी, भिंगार लष्काराचा भाग वगळून पुढे जाणार असल्याचे दिवाण यांनी सांगितले. त्यावर जिल्ह्यातून या मार्गाची समांतर आखणी करताना आम्हाला विचारा, कोणत्या ठिकाणी उड्डाणपूल आवश्यक आहे, याबाबत चर्चा करण्याच्या स्पष्ट सूचना डॉ. विखे यांनी दिल्या.

नगर-शिर्डी सहा लेनचा विषय संपला
नगर-शिर्डी सहा लेन रस्त्याचा विषय संपला असून हा रस्ता चार लेन राहणार आहे. यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम थांबवू नका. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी राज्य सरकारकडून काही निधी घेण्यात येणार असल्याचे खासदार विखे यांनी सांगितले.

उड्डाणपूलाचा विषय महिनाभरात निकाली
येत्या महिनाभरात नगर शहरातील उड्डाणपुलाचा विषय निकाली काढण्यात येणार आहे. शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय लष्कर कामाला परवानगी देणार नाही. यासाठी गरज भासल्यास उपोषण करू, मात्र तशी वेळ येणार नाही, असे डॉ. खा. विखे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींना शिर्डीला येणारे शिव्या घालतात
शिर्डी-औरंगाबाद रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर एक-एक फुट खड्डे पडलेले आहे. या रस्त्यावरून शिर्डीहून औरंगाबाद विमानतळापर्यंत जाईपर्यंत भाविक, प्रवासी या भागातील लोकप्रतिनिधींना रस्त्याच्या अवस्थेवरून शिव्या घालत असल्याचा संताप खा. लोखंडे यांनी व्यक्त केला. त्यावर विखे यांनी कोणाता रस्ता कोणाच्या अखत्यारित येतो, हेच कळत नसल्याची टिपणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या