Friday, April 26, 2024
Homeशब्दगंधशब्दगंध : सक्षमतेतून आत्मशांतीकडे

शब्दगंध : सक्षमतेतून आत्मशांतीकडे

शाळा आणि कॉलेजमधील मुलींचे प्रश्न हाताळताना त्यांच्या विविध प्रकारच्या असुरक्षितता समोर येतात. अगदी घरापासून सभोवताल ते समाजापर्यंत. घरामध्ये मुलींच्या भावना समजून न घेणे, तुलना करणे, दुर्लक्ष करणे, आज्ञाधारक असणे ही अपेक्षा ठेवणे हे सर्रास दिसते. घराबाहेर, सभोवताली, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी इत्यादी सोबत येणारे नातेसंबंधातील भावनिक ताणतणाव, शारीरिक सुरक्षिततेचा तणाव, अभ्यासाचा तणाव अशा अनेक तणावांना मुले सामोरे जातात. तसेच तुम्ही वागायला पण चांगले पाहिजे, तुम्ही पुढे पाहिजे, एक नंबर पाहिजे, सर्वगुणसंपन्न हवे याचाही तणाव असतो. करिअर करण्याचा तणाव, आयुष्यामध्ये काय बनायचे याचा तणाव असतो. ज्या मुली अजून 18 वर्षांच्या होऊन सज्ञानही झाल्या नाहीत अशा मुलींना या कोवळ्या वयात येणारे तणाव हे पुढील आयुष्यासाठी खूप धोकादायक होऊ शकतात.

याचा सर्वात मोठा परिणाम हा मुलींमध्ये असलेल्या शक्ती, हुशारी, बुद्धिमत्ता वाया जाण्यामध्ये होतो. त्यांच्यातील सहजता, आनंदी वृत्ती नाहीशी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींचा आत्मविश्वास कमी होतो. न्यूनगंड वाढतो, दिशाहीनता वाढते.  आणि मग मुली मागे राहू लागतात. स्वतःच्या कोशात जगायला लागतात, वरून ठीक दिसतात पण आतून तुटत जातात. अशाने मग काही करायची मानसिक इच्छा आणि शारीरिक ताकद दोन्हीही गमावतात. मग त्यांना समाज आळशी, उद्धट, रडक्या, भित्र्या, कामचुकार, नाजूक यापैकी काहीही लेबल लावून मोकळे होतो आणि हे घरोघरी सर्रास दिसते. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित घरांमध्ये सर्वत्र हे दिसते, हे जास्त धक्कादायक आहे.

- Advertisement -

आता खरा प्रश्न हा आहे की, यात मुलींना मदत कोण करणार? मुलींचे हे प्रश्न पालकांना कळत नाहीत आणि मुलींना तर त्यांच्या आयुष्यात नक्की काय चाललेय हेच कळत नाही. त्यामुळे असेच हे प्रश्न, ही अस्थिरता, ही अशांती मनात साचवत मुली मोठ्या होत राहतात, शिकण्यासाठी, करिअरसाठी धडपड करतात, पण त्या धडपडीत दम नसतो, स्पष्टता नसते. ती धडपड केविलवाणी होते.
आता ही कुटुंबातील वा समाजातील बाह्य परिस्थिती बदलणे, त्यांची मानसिकता बदलणे हे कठीणच. त्यामुळे स्वतःच स्वतःला मदत करणे व आपले अंतरविश्व बदलणे हे सगळ्यात उत्तम. त्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःच्या दिसण्यावर खूप मुलींना कॉम्प्लेक्स असतो. त्यात त्यांची खूप मानसिक ताकद खर्च होते. अशावेळी नेहमी लक्षात ठेवायचे की, चेहरा, उंची, शरीरयष्टी हे निसर्गतः आलेले असते, पण स्वभाव गुण, उत्तम विचार, बौद्धिक कुवत व आनंदी मन हे ठरवून बदलता येते, वाढवता येते आणि अशा लोकांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघते. तसेच घरात, घराबाहेर कितीही चुकीची वागणूक मिळाली, टीका झाली, चेष्टा झाली तरी आपण स्वतःवर विश्वास ठेवणे थांबवायचे नाही. स्वतःमध्ये न्यूनगंड तेव्हा वाढतो जेव्हा आपण चुकीच्या लोकांकडे किंवा त्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देतो.

स्वतःच्या चुकांमधून शिकायचे. कुणाला अभ्यास न केल्याने कमी मार्क मिळतात, कुणी घरात खोटे बोलते, चोरी करते, कुणी उद्धट वागते. या सगळ्या चुका स्वतःशी मान्य करणे आणि परत त्या होऊ द्यायच्या नाही याचा निर्धार करणे त्याचबरोबर स्वतःला माफ करणे हा प्रयत्न करत राहणे मनाला शांत आणि स्थिर बनवतो.

आजूबाजूची परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यामुळे स्वतःची किव करत रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी चार हात करायची हिंमत अंगी बाळगावी. आपल्याला आवडणारी गोष्ट करावी. वाचन, संगीत, फिरणे हे छंद तुम्हाला नकारात्मक अनुभव, विचार, व्यक्ती यातून बाहेर पडण्यास मदत करतात आणि आपल्याला ऊर्जा आणि प्रोत्साहन देणारे व्यक्ती, पुस्तके, अनुभव, आठवणी, विचार यांनाच आयुष्यात स्थान द्यावे. स्वतःच्या क्षमता विकसित करण्याचा सतत प्रयत्न करावा. भीती आपल्याला आपल्या क्षमता विकसित करण्यापासून लांब ठेवते. त्या भीतीला सामोरे जायची सवय लावावी. पडले, चुकले, कुणी हसले तरी चालेल पण ही वाटचाल चालू ठेवायला हवी.

थोडक्यात, आपण स्वतःला जितके शरीराने आणि मनाने सक्षम बनवत जाऊ, आयुष्याचे ध्येय आणि दिशा जसजशी मिळवत जाऊ तसतसे स्थिर, आनंदी व समाधानी आयुष्याकडे वाटचाल करायला लागू.

-दीपाली खेडकर

- Advertisment -

ताज्या बातम्या