Wednesday, April 24, 2024
Homeनगरउन्हाळ्याची चाहूल…पाण्याचे सरकारी टँकर सुरू !

उन्हाळ्याची चाहूल…पाण्याचे सरकारी टँकर सुरू !

सात गावे आणि 20 वाड्यावरील साडेसोळा हजार जनतेचा घसा कोरडा

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाचा वाढलेला चटका…पारा 36 अंशाच्या पुढे गेल्याने जिल्ह्यात खर्‍याअर्थाने उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. मात्र, जोपर्यंत जिल्ह्यात सरकारी पाण्याचे टँकर सुरू होत नाही, तोपर्यंत उन्हाळा सुरू होत नसल्याची जाणीव प्रशासनला होत नाही. मात्र, जिल्ह्यात आता सरकारी पाण्याचे टँकर सुरू झाले असून 7 गावे आणि 20 वाड्यावस्त्यांवरील 16 हजार 457 लोकांच्या घशाला कोरड पडण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे आधी लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने आता नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेसमोरील अडचणी वाढल्या आहे.यंदा जिल्ह्यात सरासरी 162 टक्के पाऊस झालेला असतांना एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात कर्जत-जामखेड तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

या ठिकाणी असणार्‍या सात गावे आणि 20 वाड्यामध्ये पहिल्या टप्प्यात पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यात जामखेड तालुक्यातील सात तर कर्जत तालुक्यात दहा सरकारी टँकरव्दारे पाणी पुरवठा होत आहे. महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील अन्य भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाला आहे.

आजपासून नगर, श्रीगोंंदा
नगर तालुक्यातील काही पट्ट्यामध्ये पावसाळ्यात पुरेसा प्रमाणात पाऊस झालेला नाही. यामुळे या भागात शेतीच्या पाण्यचा प्रश्न आधीच होता. नगर तालुक्याप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होते. त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न होता. त्यात आता उन्हाळा सुरू झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली असून नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात आजपासून पाण्याचे टँकर सुरू होणार आहेत.

आधीच कोरोना आता पाणी टंचाई
जिल्ह्यात उन्हाळ्याला सुरूवात झाली असून आधीच कोरोनामुळे त्रस्त असणार्‍या जिल्हा प्रशासनासमोर पाणी टंचाईचे संकट आहे. पाणी टंचाईच्या काळात सरकारी टँकरव्दारे पाणी पुरवठा करताना कोरोना संसर्ग वाढणार नाही याची विशेष दक्षता जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या