दोन मुलींसह आईने घेतली विहिरीत उडी

दोन मुलींसह आईने घेतली विहिरीत उडी

आईचा दुर्दैवी मृत्यू, दोन्ही मुली आश्चर्यकारक बचावल्या

करंजी (वार्ताहर)- पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी) येथील विवाहित महिलेने पोटच्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेतली. या घटनेमध्ये आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र, तिच्या दोन्ही लहान मुली सुदैवाने बचावल्या आहेत. शिराळ येथील सोनाली संतोष तुपे (वय 25 वर्ष) या महिलेने रविवार (दि.17) मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक वादातून लहान दोन मुली, आरोही (वय अडीच वर्ष) व सई (वय चार वर्ष) यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत आई सोनाली हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र सुदैवाने सई या चार वर्षाच्या मुलीने विहीरीत पडल्यानंतर विहिरीतील इलेक्ट्रॉनिक मोटरीसाठी वापरण्यात येणार्‍या दोरीला धरल्याने तिचा जीव वाचला तर अडीच वर्षाच्या आरोहीच्या अंगातील फ्रॉकचा आपोआप फुगा तयार झाल्याने ती विहिरीतील पाण्यात तरंगून राहिल्याने ती देखील सुदैवाने या मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्या. ‘देव तारी त्याला कोण मार’ असाच काहीसा प्रकार या दोन्ही लहान मुलींबाबत घडला आहे. या मुलींच्या डोक्यावरील मायेचा पदर त्यांना कायमचा पोरका झाला आहे.

मयत सोनाली हिचे शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिराळ येथे पोलीस बंदोबस्तात तणावपूर्ण वातावरणात सासरच्या दारासमोर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सोनाली यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत सासरच्या कुटुंबी विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

डमाळवाडीत महिला बुडून मृत्यू
तालुक्यातील डमाळवाडी येथे देखील रविवारी शेळ्या चारण्यासाठी गेलेली महिला चातुराबाई सुदाम डमाळे अंदाजे (वय 40 वर्ष) या शेळ्यांना पाणी पाहजण्यासाठी विहिरीवर गेल्या असता विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माहेरच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्याची मागणी केल्यानंतर त्यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. अतिशय गरीब कुटुंबातील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे डमाळवाडी गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com