Wednesday, April 24, 2024
Homeनगरजागतिक स्तरावर साखरेचा वापर अवघ्या अर्ध्या टक्क्यांवर

जागतिक स्तरावर साखरेचा वापर अवघ्या अर्ध्या टक्क्यांवर

राष्ट्रीय साखर संघ : घरगुती-औद्योगिक वापराच्या साखरेचे दर वेगवेगळे करा

अहमदनगर (प्रतिनिधी)- साखरेच्या किमान विक्री दारात (मिनिमम सेलिंग प्राईस) वाढ करण्यात यावी, घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी लागणार्‍या साखरेचे विक्री दर वेगवेगळे असावेत. साखरेच्या वापरावर जागतिक स्तरावर घट होत असून ती दोन टक्क्यांवरून थेट अर्ध्या टक्क्यावर आली आहे. जगातील लोकसंख्या वाढत असली तरी साखरेचा खाण्यासाठी होणारा वापर मात्र, कमी होत आहे. यामागे जागतिक साखर विरोधी मोहीम कार्यरत असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

- Advertisement -

साखरेचा किमान विक्री दर वाढ करण्यासोबत घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी लागणार्‍या साखरेचे विक्री दर वेगवगळे असवात याबाबत अधिक माहिती देताना नाईकनवरे म्हणाले, जगातील तीस देशांनी साखर मिश्रित उत्पादनांवर वेगवेगळे करही आकारले आहेत. एकीकडे ट्रिम, स्लिम, जिम याकडे तरुण आकर्षित होत आहेत तर दुसरीकडे मिठाई, चॉकलेट्स, बिस्किटे, शीतपेये यातील साखरेचा वापर कमी होत चालला आहे. परिणाम स्वरूप बाजारातील साखरेची मागणीही कमी होत आहे आणि याचा फटका साखर उद्योगाला बसत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध सदृश वातावरण असल्याने त्याचे परिणाम क्रूड ऑईलच्या पुरवठ्यावर व किमतीवर आणि त्याचा प्रतिकूल परिणाम भारतातील व भारताबाहेरील इथेनॉलच्या प्रकल्पांवर होण्याची भीती आहे.

कारखाना परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर इथेनॉल मिश्रणाची परवानगी दिल्यास वाहतुकीवरील खर्चात बचत होऊ शकेल. देशातील 19 राज्यांतील पाच कोटी शेतकरी 51 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक घेतात व त्यातून वर्षागणिक चार हजार लाख टन उसाचे उत्पादन होते. परंतु बदलत्या हवामानात, कमी पाण्यात, कमी दिवसात व जास्त उत्पादन करणारे उसाचे वाण अजून तयार झाले नाही. शिवाय खोडवा व्यवस्थापन हे क्षेत्र सातत्याने दुर्लक्षित राहिले आहे आणि उसाच्या दोन पट्ट्यात मिश्र पीक घेण्याच्या तंत्रातही आपण मागे आहोत अशी आव्हाने साखर उद्योगसमोर उभी ठाकली आहेत, असे नाईकनवरे यांनी विशद केले. देशात उसाची किंमत समान असावी, यावर आग्रही भूमिका घेऊन नाईकनवरे यांनी साखर उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी वाफेमध्ये तीस टक्के बचत, ऊर्जेत 25 किलो वॅटची बचत करण्यासाठी कारखान्यातील यंत्र सामुग्री अद्ययावत असावी, असे सांगितले.

घाऊक किमतीत किलोमागे सात रुपयांचा फरक
साखर कारखान्यांनी जागतिक दर्जाच्या साखरेचे उत्पादन करावे, असे सुचवून त्यांनी साखरेचे धोरण ठरविण्यार्‍यांनी (पॉलिसी मेकर्स) एस, एम व एल ग्रेड साखरेच्या किमान विक्री किमतीतील भिन्नता राखावी. तसेच साखरेची सध्याची किमान विक्री किंमत ठरविताना वित्त आणि घसारा किंमतही लक्षात घ्यावी, कर आणि साखरेच्या एक्स मिल किंमतीत व घाऊक किमतीत किलो मागे सात रुपयांचा फरक आहे, याकडे नाईकनवरे यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -

ताज्या बातम्या