साखरेची किमान विक्री किंमत वाढण्याचे संकेत
Featured

साखरेची किमान विक्री किंमत वाढण्याचे संकेत

Sarvmat Digital

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- साखरेच्या किमान विक्री किंमतीत (एमएसपी) प्रतिक्विंटल 200 रुपयांची वाढ करण्याचे संकेत आहेत. केंद्र सरकारच्या नीति आयोगाने ऊस आणि साखर उद्योगासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सनेही साखरेच्या किमान विक्री दरात प्रति क्विंटल 200 रुपयांची वाढ करण्याची शिफारस केली आहे. कृषी मूल्य व किंमत आयोगानेही 2020-21 मध्ये उसाची एफआरपी 10 रुपयांनी वाढवून ती प्रति क्विंटल 285 रुपये करण्याची शिफारस केली आहे.

मागील वर्षी साखरेच्या किमान विक्री किमतीत 200 रूपयांची वाढ ती प्रति क्विंटल 3100 रुपये करण्यात आली होती, परंतु उसाची एफआरपी कायम ठेवण्यात आली होती. चालू वर्षी मात्र विक्री किंमत आणि एफआरपी या दोन्हींमध्ये वाढ होऊ शकते अशी शक्यता आहे.

देशातील सर्वाधीक साखर उत्पादन करणार्‍या उत्तर प्रदेश सरकारनेही साखरेची एमएसपी 3100 वरून 3400 रुपये करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केलेली आहे. तर महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांनी सुद्धा साखरेची एमएसपी प्रतिक्विंटल 3100 वरून 3500 रुपये करण्यासाठी केंद्र सरकारकडे साकडे घातलेले आहे.
साखर उद्योगातील वेगवेगळ्या घटकांकडून आलेल्या प्रस्तावांवर अन्न मंत्रालय सध्या विचार करत आहोत. साखरेच्या किमान विक्री किंमतीत प्रतिक्विंटल 300 ते 500 रुपयांची वाढ करण्याची साखर उद्योगाची मागणी आहे. मात्र, ही वाढ प्रतिक्विंटल 200 रुपयांहून अधिक असणार नाही, असेही समजते आहे.

साखरेच्या किमान विक्री किमतीमध्ये वाढ केल्यास त्याची झळ सामान्य ग्राहकांना बसणार नाही. कारण साखरेचे मोठे खरेदीदार हे मुख्यत्वे अन्न पदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक उत्पादक असतात, असा साखर उद्योगाचा दावा आहे.

Deshdoot
www.deshdoot.com