Friday, April 26, 2024
Homeनगरयंदाच्या गळीतात कारखान्यांना मदतीचा प्रस्ताव नाबार्डच्या कोर्टात

यंदाच्या गळीतात कारखान्यांना मदतीचा प्रस्ताव नाबार्डच्या कोर्टात

कर्जवसुली 50 टक्के : जिल्हा बँक साखर कारखान्यांच्या कर्जाबाबत सकारात्मक

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात उसाच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पूर्ण क्षमतेने गाळप करता आले नाही. यामुळे कारखान्यांकडील जिल्हा बँकेचा कर्जाचा आकडा वाढला आहे. मात्र, येत्या हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस असून गाळप देखील पूर्ण क्षमतेने होणार आहे. यामुळे हंगाम सुरू करण्यासाठी पुन्हा जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्ज द्यावे लागणार आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने पुढील हंगामासाठी कारखान्यांना द्यावयाच्या कर्जाचा विषय नाबार्डच्या कोर्टात टाकला आहे. नाबार्डच्या निर्देशानुसार आता साखर कारखान्यांना येत्या हंगामासाठी कर्ज देणार आहे.

- Advertisement -

बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा बँकेची संचालक मंडळाची मासिक बैठक झाली. बैठकीत येत्या हंगामातील साखर कारखान्यांच्या कर्जाचा विषयावर चर्चा झाली. यावेळी व्हाईस चेअरमन रामदास वाघ, बँकेचे संचालक आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, चंद्रशेखर घुले, अरूणराव तनपुरे, दत्तात्रय पानसरे आणि अन्य संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

बैेठकीत बँकेचे वार्षिक हिशोब पत्रक, येणार्‍या वर्षभरातील बँकेचे आर्थिक धोरण आणि यापूर्वीच्या साखर कारखान्यांकडील कर्जाची थकबाकी यावर चर्चा झाली. दरम्यान, राज्य बँकेने येणार्‍या हंगामासाठी साखर कारखान्यांना कर्ज देण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. त्यास जिल्हा बँक तयार आहे. मात्र, मागील कर्जाचा विषय देखील मार्गी लागला पाहिजे, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. मात्र, साखर कारखानदारी हा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे.

यामुळे कारखाने सुरू करण्यासाठी येत्या हंगामात त्यांना अल्प मुदत कर्ज द्यावे लागणार आहे. यामुळे जिल्हा बँकेने याबाबतचा प्रस्ताव राज्य बँकेकडे आणि राज्य बँकेने हा प्रस्ताव नाबार्डकडे सादर करावा. तसेच नाबार्डच्या निर्देशानुसार येत्या हंगामासाठी कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णयाबाबत संचालक मंडळाने चर्चा केली. दरम्यान, जिल्हा बँकेचे मागील वर्षी दुष्काळामुळे अवघी 37 टक्के कर्जाची वसुली झाली होती. मात्र, यंदा हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत गेल्याचे बँकेचे चेअरमन गायकर यांनी सांगितले.

गाळप क्षमतेनुसार मिळणार कर्ज
जिल्हा बँकेच्या वतीने येत्या हंगामासाठी कारखान्यांना देण्यात येणारे कर्ज हे त्या कारखान्यांच्या गाळप क्षमतेनुसार देण्यात येणार आहे. यात किमान 30 तर जास्तीत जास्त 60 कोटीपर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांना अल्प मुदत कर्ज मिळू शकते, असे बँकेच्या सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या