Thursday, April 25, 2024
Homeनगरऊस उत्पादक शेतकर्‍यांपुढे नवे संकट

ऊस उत्पादक शेतकर्‍यांपुढे नवे संकट

जास्त पाऊस पडल्याने अनेक वर्षांनंतर उसाला निघाले तुरे

लोणी – खात्रीशीर पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ऊस पिकावर गेल्या काही वर्षांपासून अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी हुमणी तर कधी पांढरी माशी यावर्षी मात्र अधिक पाऊस पडल्याने उसाला तुरे निघाले असून त्याची वाढ मंदावल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

- Advertisement -

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक आणि अहमदनगर हे जिल्हे उसाचा पट्टा म्हणून देशात प्रसिद्ध आहेत. उसानेच या भागाला आणि इथल्या शेतकर्‍यांना आर्थिक संपन्नता आली हे सुद्धा तेवढेच खरे आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यातून प्रेरणा घेऊन राज्यात आणि देशात ही कारखानदारी विस्तारली आणि नवे आर्थिक परिवर्तन घडले.

शेतकर्‍यांनी शेतात उभ्या केलेल्या ऊस पिकामुळे जशी साखर कारखानदारी उभी राहिली तशी त्याच्या मदतीने दूध, फळे, भाजीपाला, कापूस, केळी असे उद्योगही उभे राहिले. सहकारी बँका, अनेक सहकारी संस्था, शिक्षण संस्था या उभ्या राहण्यामागचे मूळ शेतकर्‍याच्या शेतातील उसाचा मोठा वाटा राहिला. लाखो हातांना त्यातूनच रोजगार मिळाला. हजारो व्यवसायही या आधारेच उभे राहू शकले. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि समाजातील सर्वच घटकांच्या उन्नतीत हे उसाचे पीक महत्त्वाचे ठरले आहे. विशेष म्हणजे याच ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी उसाला वाजवी दर मिळावा यापलीकडे कधी फारशे काही मागितले नाही.

गेल्या काही वर्षात मात्र ऊस उत्पादक शेतकरी अडचणींचा सामना करीत आहे. उसासारख्या पिकावर रोगांनी केलेला हल्ला आणि त्यातून सावरण्यासाठी कमी पडलेले ऊस पीक शास्त्रज्ञ ही अतिशय चिंतेची बाब आहे. हुमणी, लोकरी मावा, पांढरी माशी, खोड कीड अशा अनेक रोगांचा हल्ला सहन करून उसाचे पीक वाचवणे शेतकर्‍यांना कठीण होऊन बसले आहे. पाणी टंचाई, महागाई आणि अधिक उत्पादन देणार्‍या उसाच्या नवीन जातींचे संशोधन करण्यात शास्त्रज्ञांना फारसे न आलेले यश यामुळे हे खात्रीचे पीक अडचणीत आले आहे. त्यातून त्याच्यावर अवलंबून असणारे सर्वच घटकही अडचणींचा सामना करीत आहेत. शासनाची या पिकाकडे पाहण्याची उदासीनता देखील काळजीत टाकणारी आहे.

यावर्षी चांगला पाऊस पडला. हवामानाचे सर्व अंदाज चुकीचे ठरवून निसर्गाने बळीराजाला भरभरून जल दान दिले. खरे तर चांगला पाऊस उसाला पोषक असतो पण कधी व्हावा हेही महत्वाचे असते. तसे झाले नाही तर त्याचे दूष्परिणामही भोगावे लागतात. यावर्षी नेमके तसेच घडले. उसाला अचानक निघालेले तुरे बघून शेतकरी हवालदिल बनले आहेत. उसाला तुरा निघतो याचा अर्थ उसाची वाढ थांबणे व तो आतून पोकळ पडून त्याचे वजन घटणे हा शेतकर्‍यांचा अनुभव.

यातील वास्तव्य जाणून घेण्यासाठी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्या विभाग प्रमुख एस. एस. देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस झाल्यास त्यावेळी साडेचार ते पाच महिन्याचे जे उसाचे पीक असते त्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तुरे दिसू लागतात. त्याच काळात थंडीही सुरु होते. परिणामी उसाची वाढ मंदावते. पुढच्या दीड-दोन महिन्यात त्याचे वजन कमी होण्यास सुरुवात होते. फेब्रुवारीपासून तापमान वाढण्यास सुरुवात होते व त्यामुळे उसाची वाढ होण्यास मदत होते पण तुरे आलेल्या ऊस पिकाला मात्र त्याचा फारसा फायदा होत नाही.

नगर जिल्ह्यात तापमान अधिक असते म्हणून उसाला फारसे तुरे निघत नाहीत. यावर्षी पावसामुळे तुरे दिसत आहेत. उलट कोल्हापूर जिल्ह्यात उसाला दरवर्षी तुरे दिसून येतात. एकूणच काय तर अतिवृष्टीतून सावरण्यासाठी धडपड करणार्‍या शेतकर्‍यांपाठोपाठ आता ऊस उत्पादकही अडचणींचा सामना करीत असल्याने शेतकरी आणि साखर कारखानदारी दोघांपुढेही समस्या निर्माण झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या