Thursday, April 25, 2024
Homeनगरसुट्टीतील अभ्यासासाठी दूरदर्शनवर कार्यक्रम सुरु

सुट्टीतील अभ्यासासाठी दूरदर्शनवर कार्यक्रम सुरु

लवकरच स्वतंत्र वाहिनी; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक पाटील यांची माहिती

संगमनेर (वार्ताहर) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील सह्याद्री दूरदर्शन या वाहिनी वरती सकाळी 10 वाजता ‘गली गली सिम सिम’ हा दोन तासांचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना समान दर्जाचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अभ्यासमाला सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.

- Advertisement -

राज्यात मोठ्या प्रमाणावर सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने शाळा बंद आहेत. विद्यार्थी आपापल्या घरी आपल्यापरीने शिकत आहेत. अनेक शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे, समाज माध्यमाद्वारे मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यासोबत सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे गुणात्मक शिक्षण मिळावे यादृष्टीने शैक्षणिक संशोधन प्रश्न परिषद प्रयत्न करीत आहेत त्यासाठी सह्याद्री दूरदर्शन वाहिनी वरती रोज सकाळी 10 वाजता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसात स्वयं प्रभा या दूरदर्शन वाहिनीद्वारे पूर्णवेळ शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्याचे नियोजन आहे असेही पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या कालावधीत राज्य परिषद, महाराष्ट्रतर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासमाला उपक्रम सुरू केला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्रतर्फे देण्यात येणारा अभ्यासमालेचा संदेश राज्यात सर्व शाळा, शिक्षक, पालक यांच्यापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तालुका गट शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, केंद्रप्रमुख, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना हे संदेश दररोज पाठवत आहे. मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सदर अभ्यासमालेचे संदेश आपल्या शाळेच्या शिक्षक पालक संघाच्या मदतीने जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावेत असेही सांगण्यात आले आहेत. मोबाईल, दूरचित्रवाणी याचसोबत रेडीओवर देखील शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. याचे वेळापत्रक लवकरच दिले जाणार आहे.

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी बोलकी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत राज्यातील अधिकार्‍यांसाठी व्यावसायिक विकास क्षमता वृद्धी कार्यक्रम सुरू केला आहे. यासाठी देखील प्रचंड प्रतिसाद लाभत असून सुट्टीचा उपयोग शिक्षक अधिकारी स्वतःला समृद्ध करण्यासाठी करत आहेत. शाळा बंद पण शिक्षण आहे या अनुषंगाने सुरू करण्यात आलेले उपक्रम केवळ विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलेले आहेत. या उपक्रमाचा कोणताही लेखी अहवाल कोणत्याही स्तरावर मागविण्यात येऊ नये. प्राचार्य, डायट व जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यात कार्यवाही करावी असे आदेशित करण्यात आले आहेत.
देशभरात या कोरोनाच्या संक्रमण कालावधीत आपण ‘दीक्षा’च्या सहाय्याने राज्यात विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा बंद पण शिक्षण आहे’ ही शैक्षणिक चळवळ उभी करत आहोत. यासाठी आपली साथ आणि सहकार्य शासनास अपेक्षित आहे.

अधिकारी करणार पालकांशी संपर्क
परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या अभ्यासमाला संदर्भाने जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, विस्तारअधिकारी, अधिव्याख्याता यांनी प्रातिनिधिक स्वरुपात रोज काही पालकांना फोन करून याचे संदेश प्राप्त होतात का याची खात्री करणे अपेक्षित आहे. सदर मजकूर विद्यार्थ्यांना आवडतात का? या प्रकारची चौकशी करता येईल. ज्या पालकांना असे संदेश प्राप्त होत नसतील त्या शाळेशी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करावी. पालकांना सदर संदेश पोहोचविण्यासाठी प्रेरित करावे असेही परिषदेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

शिक्षकांचे साहित्य शासनाकडे पाठविण्याचे आवाहन
अनेक शिक्षक यू ट्यूब व्हिडीओ तयार करून ते पहा असे संदेश विद्यार्थांना पाठवत आहेत. संबंधित शिक्षकांनी इयत्तानिहाय, विषयनिहाय आशय दीक्षा वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या आशयामध्ये सुधारणा आवश्यक आहे. यासाठी आपण आपले साहित्य दीक्षा वर जोडण्यासाठी ळींवशिीांरर.रल.ळप या ईमेल वर पाठवावा. प्रत्येक ठिकाणी वेगळा प्रयोग केल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना एकसमान शिकण्याची संधी उपलब्ध होण्यात अडचण निर्माण होत आहे असे निदर्शनास येत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी-काठमोरे
राज्य परिषदेच्यावतीने दररोज अभ्यास मला पुरविण्यात येत असून ती जिल्ह्याच्या वतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद प्रशासन यांच्याकडून जिल्हा, तालुका गटावरती पाठविण्यात येत आहे. त्याद्वारे शिक्षकांना अभ्यासमाला पोचवण्यात येत असताना ते शिक्षक आपल्या वर्गातील पालकांच्या गटावर ती साहित्य पाठवत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सांगितले.

‘दीक्षा’ चा करा वापर
अनेक शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास देण्यासाठी नियोजन करत आहेत. हे करत असताना वेगळा उपक्रम आखण्याची आवश्यकता असेल तरच केवळ दीक्षा वर आधारितच उप्रकम आखावेत. जेणेकरून पालकांना, विद्यार्थ्यांना नेमके काय करायचे याचा गोंधळ होणार नाही. याच्या वापराच्या नोंदी मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्या प्राधिकरणाकडे रोज उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले.

गुणवत्ता उंचावण्यास फायदा-जडे
राज्यस्तरावरून अभ्यास माला उपलब्ध करून देण्यात येत असल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान पातळी व समान दर्जाचा अभ्यास उपलब्ध होणार आहे. प्राधिकरणाच्यावतीने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासमाला रोज उपलब्ध होत असल्याने सुट्टीतही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची प्रक्रिया घडत असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अचला जडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या