चक्रीवादळग्रस्तांचे पंचनामे सुरूच
Featured

चक्रीवादळग्रस्तांचे पंचनामे सुरूच

Sarvmat Digital

मंगळवारी अंतिम अहवाल मिळण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)- निसर्ग चक्री वादळाने दिलेल्या तडाख्यात गेल्या आठवड्यात बुधवारी जिल्ह्यात अनेक तालुक्यात घरांचे, पशूधनाचे आणि शेतीचे नुकसान झाले आहेत. यात अकोले तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून शेतकर्‍यांचे जनावरे, नागरिकांची घरे आणि शेती पिकांसह महावितरण कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा गुरूवारपासून महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणे मार्फत प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

मंगळवारी याबाबतचा अंतिम अहवाल हाती येणार असल्याचे महसूल विभागाच्या सुत्रांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात बुधवारी निसर्ग चक्रीवादळामुळे संगमनेर, अकोले, पारनेर, पाथर्डी आणि राहुरी यासह अन्य तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.गुरूवारपासून जिल्ह्यात तालुकानिहाय गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकामार्फत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.

वादळात अकोले तालुक्यातील लहित बु. येथील सागर पांडुरंग चौधरी (वय 32) ही व्यक्ती मृत पावली आहे. यासह शेवगाव तालुक्यातील दोघे तर संगमनेर आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एक वादळात जखमी झाला होता. गुरूवारच्या प्राथमिक अहवालात जिल्ह्यात 787 घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. मात्र, या आकड्यात थोडी वाढ झाली असून जिल्ह्यात 741 कच्च्या घराचे अंशत: आणि 32 घरांचे शंभर टक्के तर 23 पक्क्य घरांचे अंशत: आणि 4 पक्क्या घरांचे 100 टक्के नुकसान झालेले आहे.

एकूण घरांच्या नुकसानीचा आकडा 800 झाला आहे. दुसरीकडे नुकसानग्रस्त झोपड्यांची संख्या घटली असून 23 वरून 8 पर्यंत खाली आली आहे. एका जनावरांच्या गोठ्याचेही नुकसान झालेले आहे. यासह दगावलेल्या जनावरांचा आकडा 23 वरून 24 झाला आहे.

बाधित शेतीच्या क्षेत्राचा आकडा 632 हेक्टरवरून 887 हेक्टवरपर्यंत वाढला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेतीचे नुकसान 450 हेक्टर संगमनेर तालुक्यात असून पारनेर तालुक्यात 186 हेक्टर, अकोले 80 हेक्टर, पाथर्डीत 76 हेक्टर, राहुरी तालुक्यात 61 हेक्टर, नेवासा 9.8 हेक्टर, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येकी 9.5 हेक्टर तर कोपरगाव 4.2 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

आकडेवारी वाढणार
वादळ झाल्याच्या दुसर्‍या दिवशीची ही जिल्हा प्रशासनाची प्राथमिक आकडेवारी असून आता प्रत्यक्षात पंचनामे सुरू असून या आकडेवारी अंतिम आकडेवारीत वाढ होणार आहे. त्यानंतर शासनाकडे वादळग्रस्तांच्या निकषानुसार मदतीचे प्रस्ताव जाणार आहेत. त्यावर सरकार काय निर्णय घेणार यावर शेतकर्‍यांची मदत अवलंबून राहणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com