वादळात दोन गायांचा मृत्यू ; 18 घरांचे नुकसान
Featured

वादळात दोन गायांचा मृत्यू ; 18 घरांचे नुकसान

Sarvmat Digital

नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याबाबत तहसिलदारांच्या अधिकार्‍यांना सूचना

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी वार्‍यामुळे काही भागात नुकसान झाले आहे. या वादळात झाडे अंगावर पडल्याने 2 जनावरांचा मृत्यू झाला तर 20 घरांसह शेती पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. यात जास्त फटका वेलवर्गीय पिकांसह केळी बागेलाही बसला असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अधिकार्‍यांना दिले आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन आलेल्या वादळाचा फटका श्रीरामपूर तालुक्यातील काही भागाला बसला आहे. बुधवारी सकाळपासूनच सुरु असलेल्या रिमझिम पावसाबरोबरच वाराही सुरु होता. मात्र रात्रीच्या दरम्यान जोरदार वार्‍यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. या वादळात झाड अंगावर पडून 2 जनावरांचा मृत्यू झाला. तर सुमारे कच्ची 18 घरे तर 2 झोपड्या पडल्या आहे. वादळामुळे ऊस पिके, वेलवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहे.

तर वादळामुळे नुकसान झाले असले तरी या पावसामुळे खरिप पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. दरम्यान, तालुक्यातील मालुंजा येथील गणेश सारंगधर बडाख, अरुण सारंगधर बडाख, बाळासाहेब बबनराव बडाख, निवृत्ती नरहरी बडाख, सचिन सुभाषराव बडाख, नानासाहेब दगडु बडाख, विठ्ठल बुर्‍हाडे या शेतकर्‍यांच्या सुमारे 15-20 एकरावरील जी-9 या जातीच्या केळी बागेचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील बेलापूर, पढेगाव, माळवाडगाव, खोकर, भोकर, खंडाळा, उंबरगाव, कारेगाव, वांगी, खिर्डी, उक्कलगाव, टिळकनगर, एकलहरे, वडाळा महादेव, मातापूर, अशोकनगर भागातही वादळी वार्‍यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजेच्या पोलवर झाडे तसेच फांद्या पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. काही भागात काल उशिराने वीज पुरवठा सुरळीत झाला. श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर 40 मिमी, वडाळा 40, कारेगाव 05, मालुंजा 12 मिमी याप्रमाणे पावसाची नोंद झाली.

टाकळीभान- कमी दाबाचा पट्टा तयार होऊन झालेल्या निसर्ग वादळाने टाकळीभान परिसरातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मात्र दमदार पावसाने बळीराजा काहीसा सुखावला आहे. पेरणीपूर्व मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने खरीप पिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने निसर्ग चक्रीवादळ येणार असल्याच्या चर्चेने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. वादळाचा मार्ग या परिसरातून नसला तरी बळीराजा धास्तावला होता. कमी दाबाच्या पट्यामुळे पावसाने मात्र चांगली हजेरी लावली.

बुधवारी दिवसभर व रात्रभरही पावसाच्या सरी कोसळतच होत्या. गुरुवारी पहाटे तीन वाजता जोराचे वादळ सुरु होते. सुमारे दोन तास हे जोराचे वादळ सुरु होते. या वादळाने फारशी हानी झाली नसली तरी शेतबांधावरील व गावातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी वीजवाहक तारांवर झाडे पडल्याने वीज वाहक तारा तुटून पडल्या. त्यामुळे 24 तासापेक्षा जास्त काळ वीजपुरवठा बंद होता.

दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने पेरणीपूर्व मशागती सुरु होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. रोहिणी नक्षञात पडणार्‍या पावसाकडे बळीराजाचे पेरणीपूर्व मशागतीसाठी डोळे लागले होते. मात्र निसर्ग वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून झालेल्या दमदार पावसाने बळीराजा चांगलाच सुखावला असून एक दोन दिवसात परिसरात पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरु होणार आहे.

खंडाळा – खंडाळा येथे पावसाने अनेकांचे नुकसान झाले.जोराच्या वार्‍यामुळे अनेक आंब्याच्या कैर्‍या गळून पडल्या. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.चाळीबाहेर पडलेला कांदा पावसापासून वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली. काही कांदाचाळीवरील छत वादळामुळे उडाले. कमकुवत असलेल्या घराच्या भिंती पहिल्या पावसाने भिजल्यामुळे कालचा पाऊस आणि वादळ यामुळे काही ठिकाणी भिंती जमीनदोस्त झाल्या. अनेकांचा संसार उघड्यावर आला. बंद असलेल्या वीज पुरवठा काल दुपारनंतर सुरू झाला. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे पडलेली होती. ढिल्या असलेल्या विद्युत वाहिन्या एकमेकीत अडकल्या होत्या.

Deshdoot
www.deshdoot.com