दगडखाण उत्खननप्रकरणी स्थळपाहणी करून कारवाईचे आदेश
Featured

दगडखाण उत्खननप्रकरणी स्थळपाहणी करून कारवाईचे आदेश

Sarvmat Digital

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील दिघी येथे सुरू असलेले अनधिकृत खडी क्रेशर व नजीक चिंचोली येथील अनधिकृत दगडखाण उत्खनन प्रकरणाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश औरंगाबाद येथील राज्य शासनाचे भूविज्ञान आणि खनीकर्म संचालनालयाच्या प्रादेशिक उपसंचलाकानी जिल्हा खनिकर्म अधिकारी, अहमदनगर यांना दिले आहेत.

नेवासा तालुक्यातील मौजे दिघी येथील वनक्षेत्र वाटपातील शेतजमीन गट नंबर 91/3 मध्ये अनधिकृत स्टोन क्रेशर व नजिक चिंचोली शेती गट नंबर 69/2 मध्ये दगड खाणीतून दगडाचे अनधिकृत उत्खनन सुरू आहे.

नजिक चिंचोली येथील गटामध्येही मोठ्या प्रमाणात मुरूम व दगडाचे उत्खनन करण्यात आले असतानाही नेवासा तहसीलदार यांनी मोजणी करताना कमी ब्रास दाखवले आहे. नेवासा तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांनी केलेला पंचनामा व पंचनाम्यात नमूद केलेली दगड, खडी ब्रासची संख्या मला मान्य नसून या दोन्ही गटांमध्ये त्वरित ईटीएस मशिनद्वारे मोजणी करावी.

तसेच खनिकर्म खान पट्ट्याची मोजणी अहवाल नकाशाच्या प्रतिसह दंडात्मक कारवाई करून त्याचा अहवाल मला मिळावा.अन्यथा मला संबंधितावर न्यायालयात खटला चलविण्याची परवानगी मिळावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी उपसंचालकांकडे केली होती.

त्या पार्श्वभूमीवर तक्रारदार काकासाहेब बाजीराव गायके रा. रांजणी ता. शेवगाव जि. अहमदनगर यांची दिघी ता. नेवासा येथील. गट नं. 91 म. नजिक चिंचोली येथील गट न. 69/2 मध्ये बोगस स्टोन क्रशर व बोगस उत्खनन केल्यामुळे त्याची मोजणी करून दंडात्मक कारवाई करणेबाबतची तक्रार या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने आपण प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सदर प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास व तक्रारदारास अवगत करावे असे आदेश भूविज्ञान आणि खनीकर्म संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालकांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी अहमदनगर यांना दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com