Thursday, April 25, 2024
Homeनगरराज्यातील तंत्रशिक्षण संस्थांना विद्यार्थी मिळेना

राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांना विद्यार्थी मिळेना

करोनामुळे यावर्षी मोठा फटका बसण्याची शक्यता

संगमनेर (वार्ताहर)- राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेच्या 50 टक्के विद्यार्थी मिळेणासे झाले आहे. मागील वर्षापर्यंत असलेली स्थिती यावर्षी करोना विषाणू प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव सर्वच क्षेत्रावर परिणाम करू लागला असतानाच, त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. त्यामुळे गेले काही वर्ष तंत्रशिक्षण संस्थांना पुरेसे विद्यार्थी मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यातच बारावीचा लांबलेला निकाल, लांबलेल्या प्रवेश परीक्षा, बेकारीत झालेली वाढ, वेतनात होणारी कपात, यामुळे अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका राज्यातील तंत्र शिक्षण संस्थांना बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्यात अभियांत्रिकीची शासकीय अनुदानीत व विनाअनुदानीत अशी एकूण 378 संस्था असून त्या संस्थांमध्ये सुमारे एक लाख आठ हजार विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. मात्र मागील वर्षी पदवीसाठी अवघे 55 हजार विद्यार्थी मिळाले होते. पदवी अभ्यासक्रमाची एकूण 340 महाविद्यालय असून त्यांची प्रवेश क्षमता 1 लाख 27 हजार 537 असून त्यापैकी अवघे 66 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. तर पदव्युत्तर विभागासाठी सुमारे 14 हजार विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून त्याला अवघे 4800 विद्यार्थ्यांना मिळाले होते.

वास्तुशास्त्राची एकूण 87 पदवी महाविद्यालय असून त्यांची प्रवेशक्षमता सुमारे साडेपाच हजार आहे. त्यात प्रवेश अवघे तीन हजार झाले होते. पदव्युत्तर वीस महाविद्यालय असून तेथे 510 विद्यार्थी क्षमता असून प्रवेश मात्र अवघे 339 झाले होते. व्यवस्थापन शास्त्रातील एम. एम. एस. / एम. बी. ए. अभ्यासक्रमाची 317 महाविद्यालय असून सुमारे 34 हजार विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. तर त्यापैकी तीस हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. हॉटेल व्यवस्थापन व खाद्य व्यवस्था तंत्रज्ञान पद्धतीची तीन महाविद्यालये असून 180 विद्यार्थी क्षमता आहे.

त्यापैकी 172 जागा भरलेल्या होत्या. पदवीची 11 महाविद्यालय असून 786 प्रवेश क्षमता असून अवघी 406 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर पदव्युत्तर एक महाविद्यालय असून 24 प्रवेश क्षमता आहेत त्यापैकी अवघे सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता. औषध निर्माण शास्त्रांमध्ये 394 पदविका महाविद्यालयातून तिथे 24 हजार 261 प्रवेश क्षमता असून तिथे फारसे पदे रिक्त नाहीत. पदवी अभ्यासक्रमामध्ये 292 महाविद्यालय असून 22 हजार 500 प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी साडेआठ हजार प्रवेश झालेले होते.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाची 107 महाविद्यालय असून तिथे 3200 प्रवेशक्षमता आहेत. त्यापैकी पावणेतीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर फार्मा डी ची दहा महाविद्यालय असून एकूण 300 प्रवेश क्षमता आहे त्यापैकी 261 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

मास्टर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन याची एकूण 91 महाविद्यालय असून तेथील प्रवेश क्षमता 6 हजार 388 इतकी आहे. मात्र प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अवघी 3558 इतकी आहेत. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विविध अभ्यासक्रमासाठी एकूण 974 संस्थांची निर्मिती झाली आहे.तेथे 1 लाख 48 हजार 208 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. मात्र अवघे 1 लाख 18 हजार 217 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला दिसून येते.

करोनाचा फटका
करोनाने आता ग्रामीण भागात पाय पसरायला सुरुवात केली आहे. देशभरामध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणावरती फटका विविध क्षेत्रांना बसला आहे. औद्योगिक क्षेत्रात अनेकांचे हात बेकार झाले आहेत. अनेक कंपन्यांनी कामगार कर्मचार्‍यांचे वेतन कपात केली आहे . पालकांची आर्थिक क्षमता कमी होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी हाती पैसा नसल्याने पालकांचा ओढा कमी होण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यात सर्व तंत्रज्ञान संस्थांमध्ये लाखांवरची पदे रिक्त असल्याने यावर्षी या पदांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका खाजगी व्यवस्थापनाच्या महाविद्यालयात बसणार आहे. राज्यात सरकारी महाविद्यालयांमध्ये देखील पदे रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे.

प्रश्न गुणवत्तेचा
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता मोठ्या प्रमाणावर उंचावण्यात आलेली आहेत. या संस्थांमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मात्र बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याच्या संधी मोठ्या प्रमाणावर ती कमी होत असल्याचे चित्र आहे. अभियांत्रिकी पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात कौशल्य प्राप्त होत नसल्याची बाब समोर आली होती. एकूण पदवीप्राप्त उमेदवारांमध्ये 25 टक्के उमेदवार देखील अभ्यासक्रमाच्या क्षमता प्राप्त नसल्याची बाब विविध सर्वेक्षणात समोर आली होती. ही बाब लक्षात घेता नोकरीची संधी नसल्याने विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या