एसटीला साडेतीन लाखांचे डेली चंदन

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर – कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या पुण्यात जाण्यास प्रवाशांनी सपशेल पाठ फिरविली आहे. त्यामुळे नगर-पुणे बसेसच्या फेर्‍या 8 ने घटल्या. परिणामी एसटीच्या नगर डेपोला दररोज साडेतीन लाख रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती आगारप्रमुख अविनाश माने यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाची एन्ट्रीच पुण्यातून झाली. त्या पाठोपाठ नगरातही कोरोनाचे पेशंट सापडले. राज्यातील 42 कोरोना रुग्णांपैंकी सर्वाधिक 18 रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोना संसर्गाच्या भितीने प्रवाशांनी पुण्याला जाणेच टाळले आहे. वैयक्तिक कामे पुढे ढकलत नगरकर प्रवाशांनी घरातच थांबणे पसंत केले आहे.

नगरहून पुण्याकडे दररोज 18 बसेस जात होत्या. त्यातील 9 बसेस तात्पुरत्या स्वरुपात बंद झाल्या आहेत. राहिलेल्या 9 फेर्‍यात प्रवासी नसेल तर काही बसेस अचानक कॅन्सल केल्या जातात. इतर जिल्ह्यातून नगरमार्गे पुण्यात जाणार्‍या बसेसची संख्या दररोज 650 इतकी आहे. यातील 10 टक्के बसेस (60 ते 70 बसेस) बंद झाल्या आहेत. परिणामी नगरचे उत्पन्न घटले आहे. कोरोनाच्या बाधेने एसटीचे दररोज तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न घटल्याचे माने यांनी सांगितले.

मुंबई, कल्याण, नाशिकही कॅन्सल
पुण्याकडे जाणार्‍या ड्रायव्हर, कंडक्टरांना मास्क आणि सोबत सॅनिटाईझर दिले जाते. त्यांच्या सुरक्षेची पुरेपुर काळजी घेतली जात असल्याने पुण्याकडे बस नेण्यास कोणी नकार देत नाही. पुण्यासोबतच मुंबई, कल्याण, नाशिककडे जाणार्‍या बसेसच्या बहुतांश फेर्‍या रद्द झाल्या आहेत. त्याचाही फटका नगर एसटीला बसला आहे.

बस मार्गस्थ होण्यापूर्वी फिनेलचे धुतली जाते. डेपोतही स्वच्छता राखली जाते. प्रत्येक बस ड्रायव्हर, कंडक्टरला मास्क, सॅनिटाईझर दिले जाते. कोरोनाचा मोठा फटका एसटीच्या नगर डेपोला बसला आहे.
– अविनाश माने, आगारप्रमुख

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *