सभापती निवड वादाची आज जिल्हाधिकार्‍यांपुढे सुनावणी
Featured

सभापती निवड वादाची आज जिल्हाधिकार्‍यांपुढे सुनावणी

Sarvmat Digital

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडीमध्ये संगीता शिंदे यांनी पक्ष आदेशाचा भंग केला व विरुध्द पक्षाच्या उमेदवारास मतदान केले. याप्रकरणी पंचायत समिती सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी सभापती सौ. शिंदे यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये सात दिवसांच्या आत आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले असून आज दि. 22 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकार्‍यांसमोर याची सुनावणी होणार आहे.

पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाले. त्यात सभापती, उपसभापती पदासाठी दि. 7 जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रीया पार पडली. त्याअगोदर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सभापतिपदाच्या आरक्षणाचे दोेन्ही उमेदवार काँग्रेसकडेच होते.

त्यातील संगीता शिंदे या बाजार समितीच्या सभापती असल्याने वंदना मुरकुटे या पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. दरम्यान, शिंदे यांना गटनेते पदावरून दूर करत डॉ. वंदनाताई मुरकुटे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, निवडीपूर्वी दोघींनीही पक्षाचा व्हीप बजाविला. त्यामुळे खरा व्हीप कोणाचा हा प्रश्न उपस्थित झाला. नाट्यमय घडामोडीनंतर सभापतिपदी संगीता शिंदे तर उपसभापतिपदी बाळासाहेब तोरणे यांची निवड करण्यात आली.

पक्ष आदेशाचा भंग करून संगीता शिंदे यांनी विरुध्द पक्षाच्या उमेदवारास मतदान केल्यामुळे त्यांना पंचायत समिती सदस्य म्हणून अनर्ह घोषित करण्यात यावे व त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 चे कलम 3 व 7 तसेच महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम 1987 चे नियम 6 अन्वये जिल्हाधिकार्‍यांकडे अर्जाद्वारे केली होती. त्यांनी केलेल्या अर्जावर जिल्हाधिकार्‍यांनी संगीता शिंदे यांना नोटीस बजावली असून, त्यांना सात दिवसांत लेखी खुलासा अथवा म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. याबाबत आज बुधवार दि. 22 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांसमोर सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com