आक्षेपार्ह मेसेज पाठवणार्‍यांची गय करणार नाही
Featured

आक्षेपार्ह मेसेज पाठवणार्‍यांची गय करणार नाही

Sarvmat Digital

नेवाशाच्या तिन्ही मशिदींना बंदोबस्त देणार : पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार

नेवासा (तालुका वार्ताहर)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाट्स अ‍ॅपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवून समाजात दरी निर्माण करणार्‍यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिला.

नेवासा येथील पंचायत समिती मीटिंग हॉलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवाबरोबर चर्चा करण्यासाठी नेवासा शहरात सायंकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह आले होते. मुस्लिम बांधवांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह पुढे म्हणाले की, कोरोना संदर्भात काही लोक अनावश्यक मजकूर व्हाट्सवर पाठवत आहे असे त्यांनी करू नये.

लॉकडाउनचे पालन सर्वांनी करावे. मुस्लिम बांधव व मौलाना यांच्या सोबत चर्चा झाली. शबी बारातच्या पार्श्वभूमीवर होत असलेली गुरुवारी रात्रीची नमाज शब्बे बारात ही कब्रस्थान येथे जाऊन न करता ती घरातच करावी. नेवासा शहरात एक रुग्ण आढळल्याने याची काळजी घ्यावी.

नेवासा शहरातील मर्कज मस्जिद, लक्कडशाह, आयशा या तीनही मस्जिद येथे पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. सर्वांनी लॉकडाउनचे पालन करा असे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी केले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी, नगरपंचायत मुख्याधिकारी समीर शेख आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com