सोनईतील कौतुकी नदीवरील पुलाचे काम दर्जाहीन
Featured

सोनईतील कौतुकी नदीवरील पुलाचे काम दर्जाहीन

Sarvmat Digital

स्टील, खडी, सिमेंट न वापरता मुरुमात दडपल्या नळ्या; 110 कोटीच्या शिंगणापूर-राहुरी राजमार्गाचं चांगभलं !

सोनई (वार्ताहर)- शनिशिंगणापूर- राहुरी रस्त्यावरील सोनई येथील कौतुकी नदीवरील जूना पूल तोडून नव्या पुलाचे काम सुरू करण्यात आले असून रात्रीतून उरकण्यात आलेल्या कामात कुठलाच दर्जा नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. शनिभक्तांची गरज लक्षात घेऊन पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून शिंगणापूर ते राहुरी या पंचवीस किलोमीटर रस्त्यासाठी 111 कोटी रुपयाचा निधी मिळाला आहे.

दिवाळी सणापासून रस्त्याचे व पुलांचे कामे रखडल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत होती. ब्राम्हणी, उंबरे येथील ओढ्यावरील पुलाचे काम मजबूत केले मात्र सोनईतील कौतुकी नदीवरील पुलाच्या कामात कुठलाच दर्जा नसल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. जुना पूल तोडून त्याच रात्री तळाला काँक्रिट न करता 1.60 मीटर व्यासाच्या सिमेंट नळ्या टाकून दोन्ही नळ्यांच्या मध्ये सिमेंट काँक्रिट न टाकता वरून मुरूम टाकण्यात आला आहे.

दोनच दिवसांत पुलाचे काम निम्मे झाले अजून तीन दिवसांत काम पूर्ण होईल असे दिसते. शिंगणापूर-राहुरी या सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. ठेकेदाराने सिमेंट रस्त्यावर डांबराचे ठिगळ दिले आहेत. कामाच्या सुरुवातीपासून कामात दर्जा नसल्याच्या तक्रारी असताना आजपर्यंत संबंधित विभागाने कुठलीच दखल घेतली नाही.

सोनईतील कौतुकी नदीवर पूल अतिशय वर्दळीचा आहे. शनिदर्शनामुळे हा रस्ता सतत वाहनांच्या गर्दीने फुललेला असतो. जड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने वाहतूक अनेकदा बंद राहते. या बाबीचा कुठलाच विचार न करता ठेकेदाराने पुलाचे काम बॉक्स काँक्रिट न करता पाईपावर व साईडला काँक्रिट न करता फक्त सिमेंट नळ्या व त्यावर मुरूम टाकून उरकण्यात येत आहे. संबंधित पंतप्रधान ग्रामसडक विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नेत्यांच्या कमानीलगतच ठेकेदाराचे निकृष्ट काम

सोनईचे गाव पेठ याचे मध्यभागातून कौतुकी नदी वाहते. या नदीचे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने उत्कृष्ट सुशोभिकरण केले आहे तसेच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अतिशय कल्पक अशी कमान येथे यशवंत प्रतिष्ठानने उभी केली. या कमानीचे काम गज, स्टील, सिमेंट, खडी वापरून उत्कृष्ट केले गेलेले आहे. मात्र याच कल्पक कमानी शेजारी रस्त्याचा ठेकेदार अतिशय निकृष्ट काम करून सोनईकर व प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठेविले अनंते तैसेची रहावे..

कुठलेही काम कसेही होवो शासकीय निधी वाया जावो लाईट असो नसो पाणी येवो न येवो रेशन धान्य मिळो न मिळो कुणीही कधीही कोठेही लेखी तर सोडाच पण तोंडी देखील तक्रार केली जात नाही. हे सोनई चे ठळक वैशिष्ट्य आहे आणि येथे काहीही केले तरी धकते या भावनेतून कित्येक ठिकाणी निकृष्ट कामे केली जातात. 110 कोटींच्या या रस्त्याबाबत वृत्तपत्रात अनेक वेळा छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध होऊनही जनतेचा उठाव नाही. कोणाचे काही लेखी तोंडी म्हणणे नाही.त्यामुळे जनतेकडून कररूपाने जमलेल्या निधीचे डोळ्यादेखत वाटोळे होत आहे परंतु सोनईकरांना फक्त ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ एवढेच माहित आहे.

ओढ्यांंना काँक्रिट पूल
शिंगणापूर-राहुरी या महामार्ग निधीतून सुरू झालेल्या रस्त्याचे शिंगणापूर, ब्राह्मणी, उंबरे, गोटुंबे आखाडा, वंजारवाडी इत्यादी ओढे व नाल्यावरील पुलांचे काम सिमेंट काँक्रिटने पक्के पूल तयार झालेत मात्र सोनई या महत्त्वाच्या मोठ्या गावातील मोठी कौतुकी नदीवरचा महत्त्वाचा पूल मात्र चालढकल करीत फक्त मुरूमात पाईप दडपून निकृष्ट काम करून उखळ पांढरे करून घेण्याचा ठेकेदार व अधिकार्‍यांचा डाव असून या पूर्ण रस्त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करणे गरजेचे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com