सोनई पोलिसांनी घोडेगावात पकडली दरोड्याच्या तयारीतील टोळी
Featured

सोनई पोलिसांनी घोडेगावात पकडली दरोड्याच्या तयारीतील टोळी

Sarvmat Digital

अटक केलेल्या पाचपैकी तिघे घोडेगावाचे तर दोघे बीड जिल्ह्यातील; एकजण पसार

सोनई (वार्ताहर) – नगर-औरंगाबाद राजमार्गावर घोडेगाव येथे 25 एप्रिल 2020 चे पहाटे 3:15 वाजता दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी सोनई पोलीस ठाण्याचे पथकाने घातक शस्त्रांसह जेरबंद केली आहे. एक आरोपी मोटरसायकलवरून पसार होण्यात यशस्वी ठरला. घोडेगाव येथील मुख्य पेठेत महावीर ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान 25 एप्रिल चे रात्री दोन वाजता चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्याने शेजारी जागे झाले. त्यांनी सराफाला चोरी होत असल्याची माहिती दिली. त्यानुसार सराफ व व्यापार्‍यांनी सोनई पोलीस ठाण्याला याबाबत माहिती देताच रात्रीचे गस्त पथक गाडी सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे, ज्ञानेश्वर थोरात व पोलीस पथक घोडेगावात पोचले. परंतु चोरटे मेनपेठेतून पळून गेलेले होते.

पोलीस गाडी व पथकाने नगर-औरंगाबाद राजमार्गावर दोन्ही बाजुनी पाहणी सुरू केली असता घोडेगाव चर्चजवळ झाडाजवळ काही लोक संशयास्पद असल्याचे या पोलीस पथकाला दिसून आले. संशयास्पद लोकांकडे पोलीस जाऊ लागताच चोरटे पळून जाऊ लागले परंतु पोलीस पथकाने शर्तीचे प्रयत्न पाठलाग करीत पाच आरोपी घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले. मात्र एक जण पसार झाला आहे. अटक आरोपींकडून जबरी चोरी दरोडा घरफोडीचे साहित्य त्यात कटावणी लोखंडी सुरा लोखंडी रॉड मिरचीपूड बॅटरी अशी शस्त्रे व साधने हस्तगत करण्यात आली आहे.

ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेले आरोपी घोडेगाव (ता. नेवासा) व बीड जिल्ह्यातील असून बीडचे आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपी मध्ये बाळू दशरथ गायकवाड (रा.घोडेगाव), सय्यद सिकंदर अख्तर (रा. मोहम दिया कॉलनी मोमिनपुरा बीड), राहुल साहेबराव वैरागर (रा. घोडेगाव), शंकर तानाजी जाधव (रा. नेहरूनगर बीड), संदीप शंकर पवार (रा. घोडेगाव) यांना अटक करण्यात आली असून सोनई पोलीस ठाण्यात भादवि कलम 399, 402 आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे 138/ 2020 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

पहाटे ही धरपकड चालू असताना याबाबतची अधिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांना देण्यात आली.

ही कारवाई करणार्‍या पथकात सहायक निरीक्षक जनार्दन सोनवणे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, घोडेगाव बीट हवालदार संजय चव्हाण, हवालदार दत्तात्रय गावडे, वाहन चालक हवालदार मारुती पवार, पोलीस नाईक शिवाजी माने, किरणकुमार गायकवाड, भगवान पालवे, पोकॉ सोमनाथ झांबरे, विठ्ठल थोरात, मृत्युंजय मोरे, नाईक बाबासाहेब वाघमोडे, विशाल थोरात, वैभव झिने, ठोंबरे, भांड यांचा समावेश होता.

सय्यद वर 66 तर जाधववर 52 गुन्ह्याची नोंद
पोलिसांनी पहाटे पकडून अटक केलेल्या आरोपी बाबत माहिती अशी की हे खूप कुख्यात गुन्हेगार असून सय्यद सिकंदर अख्तर बीड याची विरुद्ध बीड, लातूर, आंबेजोगाई, अहमदनगर, माजलगाव, जालना, औरंगाबाद आदी वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे सुमारे 66 गुन्ह्यांची नोंद आहे तसेच दुसरा आरोपी शंकर तानाजी जाधव राहणार नेहरूनगर बीड हादेखील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नांदेड, बीड, आष्टी, जालना, कोतवाली अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती या वेळी व ठिकाणी 52 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com