जावई वाढवताहेत पारनेरकरांची डोकेदुखी
Featured

जावई वाढवताहेत पारनेरकरांची डोकेदुखी

Sarvmat Digital

पारनेर (तालुका प्रतिनिधी)- देशभरात करोना विषाणूने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातही करोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात शहरांत अडकलेल्या नागरिकांना मूळगावी जाण्यासाठी सुट दिल्याने शहरी चाकरमान्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. तसेच जावयांनीही सासुरवाडी गाठली आहे. मात्र याच जावयांचा पाहुणचार पारनेरकरांना चांगलाच महागात पडू लागला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पिंप्री जलसेन येथील एका जावयाचा करोनाने मृत्यू झाला. तर सोमवारी (दि. 25) म्हसणे गावच्या जावयाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पारनेरकरांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. सासवड येथील रहिवासी असलेला व कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक असलेला म्हसणे गावच्या 31 वर्षीय जावयाला करोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. या करोनाबाधित जावयाची पत्नी व मुलगा यांना जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी नेले असून त्यांचे नमुने आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.

मुंबईहून आलेल्या पिंप्री जलसेनच्या जावयानंतर आता म्हसणे येथील जावयाला करोनाची लागण झाली असल्याने तालुका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 18 मे रोजी पारनेर तालुक्यातील म्हसणे येथील जावई मुंबईहून आपल्या पत्नी व मुलासह म्हसने येथे दाखल झाला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्याला त्रास झाल्याने नगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. त्या जावयाचा अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटीव्ह आला असून त्याच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा शोध आरोग्य यंत्रणेने सुरू केला आहे.

ड्राईव्हरला त्रास; 20 जण क्वारंटाईन
जावयाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या जावयाच्या सासू व सासर्‍यांना पारनेरच्या कोविड केअर सेंटरमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच पत्नी व मुलाला नगरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हसणेच्या त्या जावयाला त्रास होवू लागल्यानंतर दोन दिवसांपूर्वी एका खासगी वाहनाने नगरला पाठविले होते. वाहनाचा ड्रायव्हर पारनेर तालुक्यातील असून त्यास त्रास जाणवू लागल्याने आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेवून जिल्हा रूग्णालयात पाठविले आहे. दरम्यान बाधित जावयाच्या संपर्कातील 20 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com