सोसायट्या, जिल्हा बँक, साखर कारखान्यांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या
Featured

सोसायट्या, जिल्हा बँक, साखर कारखान्यांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना (कोविड-9) च्या नैसर्गिक आपत्तीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 17 जून 2020 पर्यंत तीन महिने पुढे ढकलण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने आज दिनांक 18 मार्च 2020 रोजी निर्गमित केला आहे.

ज्या विशिष्ट संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता, त्या संस्था वगळून बाकीच्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर थांबविण्याचा आदेश शासनाने दिलेला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका महात्मा जोतिबा फुले कर्ज मुक्ती योजना 2019 मुळे शासनाने जानेवारी 2020 मध्ये तीन महिने पुढे ढकलल्या होत्या.

पण शासनाचे आदेश कायदेशीर नव्हते, म्हणून उच्च न्यायालयाने ते 11 मार्च 2020 रोजी रद्द केले होते. परंतु शासनाने आता ‘73 कक’ अन्वये जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देऊन कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महीने पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे 17 जून 2020 पर्यंत विविध कार्यकारी सोसायट्या, जिल्हा सहकारी बँका आणि सहकारी साखर कारखाने यांच्या निवडणुका होणार नाहीत.

ज्या विशिष्ट सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असेल, तरच ती निवडणूक थांबविली जाणार नाही. आणि ज्या संस्थांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही, अशा विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, जिल्हा सहकारी बँका आणि सहकारी साखर कारखाने यांच्या निवडणुका तीन महिने होणार नाहीत. शासनाने तसा आदेश आज काढलेला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com