Friday, April 26, 2024
Homeनगरसोशल डिस्टन्सिंग, मास्क नको असल्यास गुमान दंड भरा

सोशल डिस्टन्सिंग, मास्क नको असल्यास गुमान दंड भरा

पाचशे, दोन हजार, पाच हजार असे तीन टप्प्यात पैसे द्यावे लागणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न लावणे, खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन न करणे, यासाठी दुकानासमोर आखणी न करणे आदी कारणांसाठी आता दंडात्मक कारवाई होणार आहे. यासाठी महापालिकेने या प्रत्येक बाबीसाठी तीन टप्प्यात दंडाचे दर जाहीर केले आहेत.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच प्रमुख भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, मास्क नियमित लावणे, खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करणे, संबंधित दुकानदाराने आपल्या दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगसाठी आखणी करणे याबाबत सूचना केलेल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या संदर्भात आदेश काढले.

नगर शहरात महापालिका हद्दीमध्ये महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार हे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास प्राधिकृत आहेत. त्यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सामाजिक अंतर न राखणे, सार्वजनिक ठिकाणी चेहर्‍यावर मास्क न लावल्यास पहिल्यांदा पाचशे रूपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसर्‍यांदा आढळल्यास दोन हजार आणि तिसर्‍यांदा आढळल्यास पाच हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या गुन्ह्यात हा दंड विक्रेता आणि ग्राहक यांना आकारण्यात येणार आहे.

तसेच सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याने दुकानदार, औषध विक्रेते, फळे व भाजीपाला विक्रेते, जीवनावश्यक वस्तु विक्रेते यांनी आपल्या सामाजिक अंतर राखण्यासाठी विक्रीच्या ठिकाणी समोरच्या बाजुला मार्किंग (वर्तुळ किंवा चौकट) आखणे महत्त्वाचे आहे. ते केले नसल्याचे आढळल्यास पहिल्या वेळेस दोन हजार रूपये, दुसर्‍यांदा आढळल्यास पाच हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच तिसर्‍यांदा आढळल्यास दहा हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्हिजिलन्स स्कॉडमधील पर्यवेक्षकांनी संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांमार्फत ही कारवाई करावयाची आहे. प्रभाग अधिकार्‍यांची यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या