अन् त्याच्या कष्टाचे चीज झाले !
Featured

अन् त्याच्या कष्टाचे चीज झाले !

Sarvmat Digital

वाकडी शाळेतील विद्यार्थी गणराज म्हसे हस्ताक्षर स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – वडील पक्षघाताने अंथरुणाला खिळलेले. घरी कमावती फक्त आई. अशा अडचणीत तो शिकत होता. त्याचे हस्ताक्षर सुंदर होऊ शकते, ही वाट त्याला त्याच्या वर्गशिक्षकांनी दाखविली. त्या वाटेने जात संसार चालविण्यासाठी आई अहोरात्र उपसत असलेल्या कष्टाची जाणीव त्याने ठेवत सुंदर हस्ताक्षरासाठी रात्रीचा दिवस केला. म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकडीच्या इयत्ता चौथीचा विद्यार्थी गणराज म्हसे हस्ताक्षर स्पर्धेत जिल्ह्यात पहिला आला.

गणराजचे वडील राजेंद्रकुमार पक्षघाताने आजारी असल्याने त्यांना चालणे आणि बोलणेसुद्धा शक्य नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घर खर्च, पतीचा दवाखाना हा सर्व आर्थिक भार त्याची आई वनिता यांच्यावर आला. वनिता यांनी परिस्थितीपुढे रडण्यापेक्षा लढण्याचे ठरविले. श्रीरामपूर एमआयडीसीतील एका प्रसिध्द फर्निचर मॉलमध्ये नोकरी पत्करली. नोकरी करून घरकाम, पतीचे आजारपण, मुलांचे शिक्षण हा संसाराचा गाडा हाकताना आईचे होणारे हाल चिमुकला गणराज पहात होता.

गणराज इयत्ता तिसरीत गेल्यावर त्याच्या हस्ताक्षरावर व शिक्षक राजू बनसोडे यांची नजर पडली. गणराजच्या हस्ताक्षरावर आणखी काम केल्यास ते सुलेखन ठरू शकेल, असा विश्वास त्यांना वाटला. म्हणून त्यांनी गणराजचे हस्ताक्षर सुधारण्याचे ठरविले. कॅलिग्राफी संदर्भात बनसोडे यांना तितकेसे सखोल नॉलेज नव्हते. यासाठी ते स्वतः आधी अपडेट झाले.

याकामी त्यांना गोरक्षनाथ सजन, मिलिंद बनसोडे, संजय राठोड, विलास बनसोडे, जयेश गायकवाड, हस्ताक्षरतज्ज्ञ अमित भोरकडे यांनी मदत केली. बनसोडे यांनी सुलेखनाचे ज्ञान मिळविल्यावर गणराजचा सराव सुरू केला. गणराजचे अक्षर तिरपे होते. ते आडव्या-उभ्या रेषांचा सराव करून सरळ केले. अक्षरांच्या मोतीदार वळणासाठी अंकलिपीतील फॉण्ट पाहून सराव घेतला. सुलेखनातील गणराजची प्रगती घरी त्याच्या आईला जाणीवपूर्वक सांगितली. त्यामुळे आई वनिता यांनीही सुलेखनाचा घरी दिलेला होमवर्क वेळात वेळ काढून जातीने करून घेतला.

पावणेदोन वर्षांच्या तयारीनंतर गणराज हस्ताक्षर स्पर्धेत केंद्रात, तालुक्यात आणि गेल्या आठवड्यात थेट जिल्ह्यात पहिला आला. शनिवारी उशिरा निकाल घोषित होताच म्हसे कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ‘आई व शिक्षक यांनी गणराजवर दाखविलेला विश्वास व त्याच्यासाठी घेतलेल्या खस्ता याचे त्याने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून चीज केले अशी भावना म्हसे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

आज इंग्लिश मीडियमच्या जमान्यातही पालकांची परिस्थिती नसताना विद्यार्थी घडविण्यासाठी धडपड करत असलेले शिक्षक बनसोडे व घरची परिस्थिती अडचणीची असताना आईच्या कष्टाची जाण ठेवून लढलेला गणराज या गुरु-शिष्याने ‘केल्याने होते, आधी केलेची पाहिजे’ हा संदेश गणराजने कृतीत उतरून दाखविला आहे.

वडिलांपेक्षा शिक्षकांचे कर्तव्य मोठे..!
गणराजचे वर्गशिक्षक बनसोडे यांचा मुलगा सर्वज्ञ हा त्याच्याच वर्गात शिकतो. बनसोडे यांनी ठरविले असते तर स्वतःच्या मुलाचा हस्ताक्षर स्पर्धेत नंबर येण्यासाठी त्यांना प्रयत्न करता आले असते. परंतु गणराजच्या घरची परिस्थिती त्यांना माहिती होती. त्यामुळे आपली मुले तर शिकणार आहेतच. पण गरिबाघरची मुले शिकली तर आपले ज्ञानदानाचे काम सार्थकी लागतील. हा विशाल दृष्टीकोन ठेवून शिक्षक बनसोडे यांनी गणराजची तयारी करून घेतली. सरावासाठी लागणारे पेन, कागद स्वखर्चाने आणले. गणराज जेव्हा स्पर्धेत पहिला आला, तेव्हा त्याच्यासाठी कष्ट घेणार्‍या त्याच्या वर्गशिक्षकांनी वडिलांपेक्षा शिक्षक म्हणून केलेले कर्तव्य मोठे असल्याचे सिद्ध केले.

माध्यमांचा उथळपणा…
तीन दिवसांपूर्वी याच सुलेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविणार्‍या श्रेया सजन हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिच्या सुलेखनाचे जगातल्या नेटीझन्सने कौतुक केले. तिच्या सुलेखनाला मिळालेल्या लाखो लाईक्सची भुरळ इलेक्ट्रॉनिक मीडियालाही पडली. त्यांनीही श्रेयाची स्टोरी टेलिकास्ट केली. हे करताना अनेकांनी सुलेखन स्पर्धेत श्रेयाच प्रथम आल्याचे दाखविले. श्रेयाच्या यशाबद्दल तिचे कौतुक करायलाच हवे. परंतु तिच्या कौतुकात याच स्पर्धेत पहिला आलेल्या परंतु सोशल मीडियावर पोहोचू न शकलेल्या गणराजला शोधावे, असे कुणालाही वाटले नाही. माध्यमांच्या उथळपणामुळे पहिला येऊनही गणराज दुर्लक्षित राहिला.

Deshdoot
www.deshdoot.com