गणेश कारखान्याच्या आवारात आग; मोठी दुर्घटना टळली

गणेश कारखान्याच्या आवारात आग; मोठी दुर्घटना टळली

वेळीच प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश

अस्तगाव/एकरुखे (वार्ताहर) – श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या आवारात काल दुपारी गोडाऊनच्या पश्चिम बाजुला असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागली, परंतु सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. कारखाना व्यवस्थापनाने वेळीच प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली.

गणेश कारखान्याच्या पश्चिम बाजुला कारखान्याच्या आवारात साखर गोडावूनच्या शेजारी असलेल्या वाळलेल्या गवताला काल दुपारी 2.30 च्या सुमारास आग लागली. गवत वाळलेले असल्याने काही वेळेतच आगीने उग्ररुप धारण केले. त्यामुळे आग झपाट्याने पसरली. कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ यंत्रणेला सतर्क करुन अग्निशमन यंत्रणेस पाचारण केले. शिर्डी येथील साईबाबा संस्थान, शिर्डी नगर पालिका, राहाता नगर पालिका, तसेच विखे कारखान्याच्या अग्निशमन गाड्या काही वेळेतच दाखल झाल्या.

आगीने उग्ररुप धारण केल्याने मोठा धूर परिसरात दिसू लागल्याने काहीकाळ काळजीचे वातावरण दिसून येत होते. वाळलेल्या गवतात काही लाकडे पडलेली होती. त्याबरोबर ऊस वाहण्यासाठी असणार्‍या कालबाह्य झालेल्या 10-12 टायर गाड्या आदी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. आगीचे लोण साखर गोडाऊनच्या भिंतीपासुन काही अंतरावर होते. आग विझवण्यात यंत्रणेला यश आले. अन्यथा गोडाऊनमध्ये असलेल्या साखरेचे उष्णतेने पाणी झाले असते.

कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, संचालक अ‍ॅड. शिवराम गाडेकर यांनीही तात्काळ घटनास्थळी दाखल होवून माहिती घेतली. कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजीत भागडे, तसेच अन्य खाते प्रमुखांसह सुरक्षा विभागाचे कर्मचारी, कामगार यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विखे पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक ढोणे, आमदार विखे पाटील यांचे स्विय सहायक प्रमोद राहाणे, व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्विय सहायक अरुण म्हस्के हेही संपर्कात होते.

काल उशीरापर्यंत गणेशची अग्निशमन पाणी मारत होती. धुर निघण्याचे थांबत नाही तोपर्यंत या अग्निशमनने घटनास्थळी तळ ठोकला होता. कारखाना मागील हंगामात बंद असल्याने घटनास्थळी पावसाळ्यात गवत उगलेले होते. ते वाळल्याने व तेथे विजेचे खांब असल्याने विजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले असावे व त्यामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com