श्रीरामपूर तालुक्यात 14 पिंजर्‍यांना बिबट्यांची हुलकावणी!
Featured

श्रीरामपूर तालुक्यात 14 पिंजर्‍यांना बिबट्यांची हुलकावणी!

Sarvmat Digital

नागरिकात बिबट्यांची दहशत कायम !

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तालुक्यात 14 ठिकाणी पिंजरे बसविले आहेत. मात्र अद्यापपर्यंत एकाही पिंजर्‍यात बिबट्या अडकलेला नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये बिबट्यांची भीती कायम आहे. तर अधून-मधून ग्रामीण भागात बिबट्याकडून प्राण्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत.

काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे एका तीन वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. ही घटना ताजी असतानाच काही दिवसांत पिंपळगाव फुणगी येथेही एका मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले. तर मागील वर्षी कुरणपूर येथील एका मुलाचाही बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे.

याव्यतिरिक्त तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याकडून शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, गाई आदी प्राण्यांवर अधून-मधून हल्ले होत आहेत. तर अनेक नागरिकांना वस्ती परिसरात, शेतात बिबट्या निदर्शनास पडण्याच्याही घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये बिबट्याची भीती कायम आहे.

दरम्यान, तालुक्यातील काही भागात बिबट्या निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे. यासाठी वनविभागाच्या अधिकार्‍यांनाही कळविण्यात आलेले आहे. घटनेचे गांर्भीय ओळखून वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी जाऊन पाहणी करून नागरिकांना सावधानतेच्या सूचना करून आवश्यक तेथे पिंजरे लावण्यात आलेले आहेत.

असे असताना काही अंशी वनविभागाच्या कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या प्रमाणामुळे अडचणीही येत आहेत. त्यामुळे अनेक भागात बिबट्याचा हल्ला झाल्याच्या घटना घडल्यानंतर वनविभागाला माहिती देऊनही वनविभागाचे कर्मचारी वेळेत पोहचू शकत नाही. त्यामुळे अनेकदा नागरिकांमध्ये वनविभागाविषयी नाराजीचा सूर उमटत असतो.

एकंदरीतच बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे वनविभागही जागा झाला असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तालुक्यातील माळवाडगाव, ममदापूर, उक्कलगाव, गळनिंब, कडित, मांडवे, राजुरी, चांडेवाडी, ममदापूर याठिकाणी 14 पिंजरे बसविण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य लक्षात घेऊन वनविभागाच्या कर्मचार्‍यांकडून ड्रोन कॅमेर्‍याचाही वापर सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत यातील एकाही पिंजर्‍यात बिबट्या अडकला नसल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.

बिबट्याच्या भितीपोटी पेटविला ऊस
मागील काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे ऊसतोडणी करत असताना ऊसतोडणी कामगारांना बिबट्या निदर्शनास पडला. त्यामुळे ऊसतोडणी कर्मचार्‍यांनी भितीपोटी ऊसतोडणी बंद केली. अखेर बिबट्याच्या दहशतीमुळे ऊस पेटवून दिल्यानंतरच ऊसतोडणी मजुरांनी ऊस तोडणीस सुरुवात केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com