Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपुरात क्वॉरंटाईन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू

श्रीरामपुरात क्वॉरंटाईन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू

करोना की दमा ? अहवालानंतर स्पष्ट होणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपुरातील 55 वर्षीय एक इसम कल्याण येथून श्रीरामपुरात आल्यानंतर त्याला श्रीरामपुरातील शाळेत क्वॉरंटाईन करण्यात आले. मात्र त्याला दोन दिवसांपूर्वी दम्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते.त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दि. 7 जून रोजी मुंबई उल्हासनगर येथून एक इसम श्रीरामपुरात आला होता. त्याला श्रीरामपूर नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पर्‍हे यांच्याकडे आणले. त्यांनी त्याची तपासणी केली असता त्याला पूर्वाश्रमीचा दम्याचा त्रास होता. त्याला गोळ्या औषध देऊन नवीन शाळेत क्कॉरंटाईन केले. मात्र दि. 11 जून रोजी ढगाळ हवामानामुळे त्याला दम्या सारखा त्रास झाला व त्याची तब्येत बिघडली. डॉ. पर्‍हे यांना ही माहिती कळल्यानंतर ते स्वतः आपले सहकारी पंडित व चव्हाण यांना घेऊन या व्यक्तीस क्वारंटाईन केलेल्या शाळेत गेले. तपासणी करून ग्रामीण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत जमधडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

डॉ.पर्‍हे यांनी पोलिसांशी संपर्क साधून नातेवाईकांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. शहर पोलीस ठाण्याचे जोसेफ साळवी यांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना माहिती दिली. या व्यक्तीला पत्नी, मुली व भाऊ असल्याचे समजले. धोका नको म्हणून आपसात चर्चा करून त्याला नगर येथे पुढील तपासणीसाठी व उपचारासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 108 रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. मात्र या रुग्णवाहिकेत पुरेसा कर्मचारी वर्ग नव्हता. शिवाय त्याची अवस्था पाहून चालकाने कोणीतरी दोन माणसे मदतीला द्या.

नगरला रुग्णाला रुग्णवाहिकेतून खाली घ्यायला तेथील कर्मचारी सहकार्य करीत नाही असे सांगितले. वास्तविक या रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व इतर आवश्यक कर्मचारी वर्ग असतो. मात्र यावेळी तो नव्हता उलट चालकाने दोन मदतनीस द्या अशी मागणी केली. काही वेळ थांबून रुग्णवाहिका निघून गेली. शेवटी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी नगरपालिकेची कोव्हिड रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला नगरला पाठवण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याने श्रीरामपुरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचा मृत्यू करोना की दम्यासारख्या अन्य इतर आजारामुळे झाला हे तपासणी अहवाल आल्यानंतरच कळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या