श्रीरामपूरच्या पाटात नाऊरच्या तरुणाचा मृतदेह
Featured

श्रीरामपूरच्या पाटात नाऊरच्या तरुणाचा मृतदेह

Sarvmat Digital

नाऊर (वार्ताहर) – श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं 3 मधील साईनगर बाजारतळ परिसरात पाटाच्या पाण्यात नाऊर येथील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. गणेश आप्पासाहेब शिंदे (वय 21) असे मयत तरुणाचे नाव आहे. काल रविवार दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरात पाटाच्या पाण्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह पाण्याबाहेर काढला. नंतर पंचनामा करण्यात आला.

मृतदेहाची पहाणी केली असता त्याच्याजवळ सापडलेल्या मतदान कार्डावरुन सदर तरुण श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील गणेश आप्पासाहेब शिंदे हा असल्याची ओळख पटली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सरपंच सोन्याबापू शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

त्याचे आई-वडील शेतमजुरी करून उपजिविका करतात. त्याच्या आई-वडिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 8 दिवसांपूर्वी मयत गणेशचा मोबाईल, पाकीट व कागदपत्रे हरवले होते. त्याला पोहता देखील येत नव्हते, त्यामुळे थंडीच्या दिवसांत पाटावर जाण्याचे काहीही कारण नसताना त्याचा मृतदेह पाण्यात आढळल्याने ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे. सदर तरुणावर रात्री आठ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com