श्रीरामपूर शहराच्या घनकचर्‍यासाठी आज मतदान
Featured

श्रीरामपूर शहराच्या घनकचर्‍यासाठी आज मतदान

Sarvmat Digital

घनकचरा ठेक्यात लाखोंची वाढ कोणाच्या सांगण्यावरून – भाजपा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात तब्बल 9 लाख रुपयांची वाढ करून 23 लाखांचा ठेका 32 लाखांना देण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासन करत आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा डाव हाणून पाडावा, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे अक्षय वर्पे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर नगरपालिका आधीच शहरांमध्ये कचरा उचलणे, साफसफाई करणे, स्वच्छता करण्याबाबत अपयशी ठरली आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी प्रति महिना 16 लाखांचा ठेका 23 लाखांना देऊन पण शहरात स्वच्छतेची बोंबाबोंब झाली. उद्या होणार्‍या विशेष सभेत घनकचरा व्यवस्थापन ठेका फायनल केला जाणार आहे.

त्यात हा ठेका 23 लाख रुपये प्रति महिन्यावरून 32 लाख रुपये प्रति महिना देण्याचे निश्चित केले असल्याचे समजते. हा जनतेचा पैसा असल्याने सर्व नगरसेवकांनी पालिका प्रशासनाचा हा डाव उलथवणे गरजेचे आहे. जे विरोध करणार नाही त्यावरून नेमके जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे कोण? हे उघडे पडणार असल्याचे मत अक्षय वर्पे यांनी व्यक्त केले आहे.

साफसफाई ठेक्याबाबत जनतेची नाराजी असतानाच नगरपालिका प्रशासन हुकूमशाही पद्धतीने ही लूट करणार असेल तर भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशाराही, भाजपाचे नेते गणेश राठी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कडूसरकर, माजी अध्यक्ष मारुती बिंगले, बाळासाहेब अहिरे, विलास थोरात, युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रवि पंडित, अक्षय नागरे, निलेश जगताप, अमोल अंबिलवादे यांनी दिला आहे.

नगरसेवकांच्या घरी जाऊन घेणार मतदान
शहरातील घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात वाढ करण्याचा ठराव आज मंजुरीसाठी विशेष सभा बोलिवण्यात आली आहे. मात्र ‘करोना’ च्या पार्श्वभूमीवर पालिका सभागृहात ही सभा न घेता या ठरवावर आज (शुक्रवारी) प्रत्येक नगरसेवकाच्या घरोघर जाऊन मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे या ठरवाकडे श्रीरामपूकरांचे लक्ष लागले आहे.

घनकचरा ठेक्याबाबत गैरसमज करु नये  – अनुराधाताई आदिक

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- 14 व्या वित्त आयोगातून नगरपरिषदांना प्राप्त होणार्‍या अनुदानातील 50 टक्के बंधनकारक रकमेतून घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत साफसफाई होण्याबाबत निर्देश आहे. त्यानुसार पालिका निविदेमार्फत हा ठेका 33 लाख 89 हजार 421 रुपये रकमेत देत आहे. यात खत प्रक्रियेच्या कामाचे 6 लाख 49 हजार 500 रुपये तसेच वाहन परतावा 2 लाख 6 हजार 400 हे वजा होणार आहेत. निव्वळ 25 लाख 63 हजार 521 इतकी रक्कम नवीन ठेकेदारास जाणार आहे. त्या रकमेचेच बील त्यास दिले जाणार आहे. याबाबत कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये, असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत साफसफाईचे घर ते घर कचरा संकलन करणे, हॉटेल, फळ विक्रेते व्यावसायिक यांच्याकडील कचरा संकलन करणे, शहरातील रस्ते व मैदाने झाडू सफाईकरणे, गटारे, नाले चेंबर सफाई करणे, सार्वजनिक शौचालये व मुतारी सफाई करणे या दैनंदिन स्वच्छतेच्या कामाचा ठेका देण्यात आलेला आहे. पालिकेने मागील ठेका 22 लाख 98 हजार 651 रुपयाला दिला होता.

हा ठेका आता 33 लाख 89 हजार 421 रुपयात देण्यात आला असला तरी यातून 2 लाख 6 हजार 400 रुपये गाडी परतवा पालिकेला मिळणार आहे. तसेच 6 लाख 49 हजार 500 रुपयांची रक्कम ही ठेकेदारास त्याने जेवढ्याप्रमाणात खत निर्मिती करेल तेवढीच रक्कम अदा केली जाणार आहे. तरी या रकमेबाबत आरोप करणार्‍यांनी योग्य अभ्यास करुन शहानिशी करावी, असे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले.

नवीन ठेकेदाराकडून सफाई कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे. तशा सूचना ठेकेदारास देण्यात आलेल्या आहेत, असेही नगराध्यक्षा यांनी सांगितले. परंतु नवीन निविदा प्रक्रियेत मासिक बिल रुपये 33,89,421 जरी दिसत असले तरी कामानुसार खतप्रक्रिया करणे कामाचे रुपये 6 लाख 49 हजार 500 व वाहन परतावा रुपये 2 लाख 06 हजार 400 हे वजा जाता सदर ठेका 25,63,521 इतकी रक्कमच होत असून त्या रकमेत देखील ठेकेदार जितके दैनंदिनरित्या करेल तितकेच बिल नवीन ठेकेदारास देण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com