Thursday, April 25, 2024
Homeनगरआधुनिक युगात हरविलेल्या ‘एकत्रित कुटूंब पध्दती’ चे होतेय दर्शन !

आधुनिक युगात हरविलेल्या ‘एकत्रित कुटूंब पध्दती’ चे होतेय दर्शन !

कोरोनामुळे गावाकडे एकवटली कुटूंबे; जुन्या आठवणींना मिळतोय उजाळा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– एरव्ही सणासुदीला, लग्नकार्याला, यात्रा अन् काही कौटूंबिक कार्यक्रमानिमित्त गावाची आठवण येणार्‍या गावाकडीलच मात्र शहरात नोकरी, व्यावसायानिमित्त स्थायिक झालेल्या नागरिकांना आता गावाची ओढ लागली आहे. तर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरच लॉकडाऊनच्या अगोदरच अनेकांनी शहरातून काढता पाय घेत गावाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आता शहरापेक्षा ‘आपला गावच बरा’ असेही या संकटकाळात अनेकांनी बोलून दाखविले. तर सध्या गावाकडे अनेक कुटूंबिय एकत्र आल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरविलेल्या एकत्रित कुटूंब पध्दतीचे दर्शन घडत आहे.

- Advertisement -

देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. अत्यावश्यक सेवा-सुविधा वगळता सर्व व्यवसाय बंदचे आदेश देण्यात आलेले आहे. जिल्ह्यात बाहेरुन येणार्‍या नागरिकांची चौकशी केली जात असून अनेकांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आलेले आहे. तर उद्योग, व्यवसायानिमित्त गावाकडील शहरात गेलेले अनेक नागरिक लॉकडाऊन झालेले आहे. तर काहींनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अगोदरच गावचा रस्ता धरल्याने काहीजण आपल्या गावी परतले आहे.

शहरात कोरोनाचा वाढत प्रादुर्भावामुळे प्रशासनाने शहरातील मोठ मोठे उद्योग, व्यवसाय, कंपन्या बंदचे आदेश देऊन कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात कंपनीत नोकरीस ग्रामीण भागातील असणारे अनेक तरुण तसेच नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यास असलेले नागरिकही कुटूंबासहित गावी परतले. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात अनेक कुटूंब एकत्र आल्याचे चित्र आहे. यातून जुन्या आठवणी, नाते यांना उजाळा मिळत आहे. तर काळाच्या ओघात लुप्त झालेली एकत्रित कुटूंब पध्दती पहावयास मिळत आहे. तर दुरावलेली नातेही यानिमित्त जवळ आले आहे. एकंदरीतच एरव्ही काही कार्यक्रमानिमित्तच येणारी शहरी मंडळी मात्र आता या संकटकाळी गावाशी नाळ जोडू पहात आहे.

ग्रामीण भागात यात्रा उत्सव साजरे करण्यास मोठे महत्व दिले जाते. यानिमित्त पााहुणे, माहेरी गेलेल्या मुली तर सर्व गोतावळ्याच यानिमित्त एकत्र येत असतो. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने सर्व यात्रा, उत्सव रद्दचे आदेश दिल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडलेच. मात्र गावावर कोरोनाचे संकट येऊ नये, कोरोनापासून गाव सुरक्षित रहावा, या पार्श्वभूमीवर शासनाने आदेश दिल्याचे मानून गावकर्‍यांनी यात्रा उत्सव साजरे न करण्याचे ठरवून शासन आदेशाचे पालन केलेले आहे. त्यामुळे गावाकडील मंडळीही घरात थांबून आहे. कोरोनामुळे शहरातून परतलेल्या आपल्या कुटूंबातील लोकांसोबत वेळ घालवित आहे. यातून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळत असून कुटूंब एकत्रित दिसत आहे.

शहराबरोबरच आता ग्रामीण भागापर्यंतही कोरोना व्हायरस येऊन ठेपला आहे. प्रशासनाकडून खबरदारीचे सर्व त्या उपाययोजना राबविल्या जात आहे. जिल्ह्यात, शहरात, गावात बाहेरुन येणारांची चौकशी सुरु आहे. तर आता तालुक्यातील गावागावात वाड्या वस्त्यावरही नागरिकांनी स्वत: रस्ते लॉकडाऊन करुन बाहेरील लोकांना प्रवेश नाकारल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या