श्रीरामपुरात अत्यावश्यक सेवेच्या फलकाचा गैरवापर
Featured

श्रीरामपुरात अत्यावश्यक सेवेच्या फलकाचा गैरवापर

Sarvmat Digital

नगरसेवक राजेंद्र पवार यांच्यासह दोघांच्या चार चाकी जप्त ; 25 जणांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कुणीही अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. परंतु तरीही एका नगरसेवकाने आपल्या कारवर अत्यावश्यक सेवा असे स्टिकर चिटकवून शहरात कार आणली. या नगरसेवकांसह 25 जणांनी तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक राजेंद्र पवार यांच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या अवघ्या विश्वामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. भारतामध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव थोपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला. तसेच प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नये, अनावश्यक गर्दी टाळावी, तोंडाला रुमाल किंवा मास्क वापर करावा तसेच अनावश्यक प्रवास टाळावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही अनेक नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे रोजच अनेक वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. सुमारे आठ- दहा दिवसापासून पोलिसांकडून अशा वाहनधारकांवर कारवाई सुरू आहे.

दरम्यान काही नगरसेवक अत्यावश्यक सेवेचा बोर्ड चारचाकी वाहनावर चिटकवून विनाकारण शहरात फिरत असल्याची तक्रार श्रीरामपूरमधून दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांकडे सोशल मीडियावर करण्यात आली होती. यासोबत पुरावा म्हणून फोटोही पाठविण्यात आला होता. जिल्हाधिकार्‍यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना संबधितांना समज देण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुख्याधिकार्‍यांनी संबधितांना तोंडी सूचना करूनही उपयोग झाला नाही. अखेर काल पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

काल पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नगरसेवक राजेंद्र पवार यांची इनोव्हा (क्रं. एम. एच. 41 क्यू 4554) तसेच आणखी एक फॉर्च्यूनर ( क्र. एम.एच.17 बी.जी. 50) तसेच इतर दुचाकी अशी एकुण 25 वाहनांवर जप्तीची कारवाई केली. तसेच नगरसेवक राजेंद्र पवार यांच्यासह 25 जणांविरुध्द भा.द.वि. कलम 186, 269 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com