Wednesday, April 24, 2024
Homeनगरगुद्द्यांच्या राजकारणात श्रीगोंदा फणफणणार

गुद्द्यांच्या राजकारणात श्रीगोंदा फणफणणार

कारण जिल्हा बँक, नजरेसमोर साखर कारखान्यांच्याही निवडणुका

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुका तसा राजकीय संघर्षासाठी परिचित असला तरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते घेत असलेली संयमाची भूमिका विसरून दुसर्‍या फळीतले कार्यकर्ते एकमेकांना भिडायला तयार झाल्याचे चित्र आहे. जिल्हा बँक संचालकपद निवडणुकीबरोबरच कुकडी सहकारी साखर कारखाना आणि स्व. शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) सहकारी कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. माजी आमदार राहुल जगताप आणि जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांच्यात सुरू झालेला संघर्ष हा आगामी निवडणुकीत काय होणार, याची झलक दाखविणारा ठरत आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणात नागवडे, पाचपुते, जगताप घराणे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. अनेक वेळा त्यांच्यात संघर्ष झाले असले तरी अनेकदा जय-पराजयात त्यांची संयमाची भूमिका देखील जिल्ह्याने पाहिली आहे. तालुक्यातील श्रीगोंदा सहकारी कारखाना व कुकडी सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीबरोबर सेवा सहकारी संस्थाच्या बहुतांशी पंचवार्षिक निवडणुका याच वर्षात होत आहेत.

तालुक्यातील मागील चाळीस वर्षात तालुक्याचे राजकारण स्व. शिवाजीराव नागवडे, ‘कुकडी’चे संस्थापक स्व. कुंडलीकराव जगताप तसेच विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या भोवती फिरत होते. आता दुसरी फळीतले कार्यकर्ते-नेते तयार होत आहेत. जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या विरोधात एका सेवा संस्थेच्या सचिवाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कोणाच्या नावाचा ठराव करायचा आणि तो आपल्याच बाजूचा असला पाहिजे, यासाठी हा संघर्ष होताना दिसत आहे.

जिल्हा बँकेचे संचालक होणे प्रतिष्ठेचे मानले जाते. सेवा संस्थेची कर्ज प्रकरणे मंजूर करताना गावोगावच्या कार्यकर्त्यांशी संपर्क येत असतो. सहकारी कारखान्यांना कर्ज प्रकरणे मंजूर करताना बँकेच्या संचालकांना ‘वेगळेच’ महत्व येत असल्याने जिल्हा बँकेचे संचालक होण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत आहेत. विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे हे देखील पुन्हा निवडणुकीत उतरण्यासाठी तयारीत असल्याने सेवा संस्था प्रतिनिधी मतदारसंघात जगताप विरुद्ध पानसरे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जगताप आणि पानसरे यांच्यातील वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याने तालुक्यातील राजकारणात वेगळाच संघर्ष पहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

प्रतिष्ठा पणाला
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इच्छुकांची प्रतिष्ठा पणाला लागताना मोठा घोडेबाजार होण्याची चिन्ह आहेत. या नंतर होणार्‍या कुकडी आणि श्रीगोंदा सहकारी कारखाना निवडणुकीसाठीही नेत्यांबरोबर इच्छुकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीतही जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडसाद पडण्याची शक्यता असल्याने पुढील काही काळ तालुक्यातील राजकारणात गरमागरमी राहण्याचीच शक्यता अधिक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या