शिवसेनेचे नेते अखेर ‘आयुर्वेद’च्या दारी
Featured

शिवसेनेचे नेते अखेर ‘आयुर्वेद’च्या दारी

Sarvmat Digital

प्रभाग सहा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभाग सहा (अ) मधील पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून आतापर्यंत एकही दिवस बरोबर न राहिलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रचारासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिल्यानंतर एकत्र आल्याचे भासवित आहेत. विशेष म्हणजे यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना आयुर्वेद कॉलेज परिसरातील राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या कार्यालयात यासाठी धाव घ्यावी लागली.

प्रभाग सहा (अ)मध्ये पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. येथील शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेविका सारिका भूतकर यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र फेटाळण्यात आल्याने येथे पोटनिवडणूक होत आहे. ही जागा बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न होते, मात्र त्यास यश आले नाही. या प्रभागातील चारपैकी तीन नगरसेवक भाजपचे आहेत. विशेष म्हणजे महापौर बाबासाहेब वाकळे याच प्रभागातून प्रतिनिधीत्त्व करत आहेत. येथे भाजप आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत होत आहे.

या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत राष्ट्रवादीने पूर्णतः पाठ दाखविलेली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने भाजपची सत्ता आहे. आताही या दोन पक्षांत महापालिकेत चांगले गुळपीठ आहे. या दोघांमुळे सर्वाधिक जागा येऊनही शिवसेनेला सत्तेबाहेर रहावे लागले आहे. महापालिकेतील निर्णय देखील हे दोन पक्षच घेत असल्याने शिवसेना एकाकी पडलेली आहे. त्यात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावर नाराज होऊन काही नगरसेवकांनी सवतासुभा निर्माण केला आहे. त्यामुळे शिवसेनेची अवस्था बिकट झालेली आहे.
पोटनिवडणुकीतील उमेदवार शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असा महाविकास आघाडीचा असल्याचे शिवसेना सांगत असली, तरी हे दोन्ही पक्ष संपूर्ण प्रक्रियेत शिवसेनेसोबत दिसले नाहीत.

6 फेब्रुवारीला मतदान असल्याने या प्रभागातील प्रचार आज 4 फेब्रुवारीला संपत आहे. एक दिवस शिल्लक राहिल्याने शिवसेनेने हालचाली केल्यानंतर पक्षाकडून संपर्कप्रमुख कोरगावकर यांना नगरला धाडण्यात आले. येथे येऊन राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांची भेट घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कोरगावकर, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे आदी नगरसेवकांनी आ. जगताप यांची भेट घेऊन प्रचारात सक्रीय होण्याची विनंती केली. ती आ. जगताप यांनी मान्य केली. आमचे कार्यकर्ते प्रभागात शिवसेनेचे काम करतील, असा शब्द दिला.

मात्र एकत्रित प्रचारफेरी काढणार का, याबाबत अद्याप निश्चित काहीही ठरलेले नाही. शिवसेना नेते आणि आ. जगताप यांच्या या भेटीपासून उपनेते अनिल राठोड व त्यांचे समर्थक अलिप्त होते. पक्षातील राठोड यांना मानणारे काही नगरसेवक आयुर्वेदवर कोरगावकर यांचा आदेश म्हणून गेले होते, मात्र आपण छायाचित्रात कुठेही येणार नाही, याची काळजी ते घेत होते.

एकीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचे चित्र निर्माण केल्याचा प्रयत्न केला असताना, दुसरीकडे भाजपने प्रभागात ‘घर टू घर’ असा प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे कार्यकर्ते प्रभागातील मतदारांना थेट भेटून प्रचार करत आहेत. या प्रभागात शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्यामुळे यावेळीही शिवसेनेचाच विजय होईल, असे सांगत असतानाच राष्ट्रवादीचे नेते सोबत दिसल्यास शिवसेनेच्या विजयात अडथळा निर्माण होईल, असा सूरही शिवसेनेतून निघत आहे. प्रचाराचा आज अखेरचा दिवस असल्याने महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्ष एकत्रित प्रचार फेरी काढणार का, याकडेच आता मतदारांचे लक्ष आहे.

शिवसेनेचा येथेही सवतासुभा
प्रभागात काल सोमवारी सायंकाळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत प्रचारफेरी काढण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे कोणीही नव्हते. तसेच शिवसेनेचे नाराज नगरसेवक प्रभागात एकीकडे स्वतंत्र प्रचार करत होते, तर दुसरीकडे राठोड प्रचार फेरीत होते. शिवसेनेतील नाराज नगरसेवक आणि आ. जगताप यांच्यातील जवळीक वाढल्यामुळे राठोड समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com