Wednesday, April 24, 2024
Homeनगरबोल्हेगाव-गणेश चौक रस्त्यावर शिवसेना-राष्ट्रवादीत एकमत

बोल्हेगाव-गणेश चौक रस्त्यावर शिवसेना-राष्ट्रवादीत एकमत

मनपा विरोधी पक्षनेत्याने चौकशीची मागणी करताच शिवसेनाही सरसावली

अहमदनगर (प्रतिनिधी) –  राज्यात एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करणार्‍या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नगरमध्ये संघर्ष कायम असला, तरी बोल्हेगाव-गणेश चौक रस्त्यावरून मात्र एकमत झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर (राष्ट्रवादी) यांनी पदभार घेताच या रस्त्याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर मंगळवारी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हीच मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करत एकत्रित संसार सुरू केला आहे. असे असले तरी नगरमध्ये अद्याप राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सूत जमलेले नाही. महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही ते दिसून आले. एवढेच नव्हे,

महाआघाडीचा राज्यात दुष्मन असलेल्या भाजपबरोबर राष्ट्रवादीचे नगरमध्ये गुळपीट आहे. शिवसेनेचे महापालिकेत जास्त नगरसेवक असून आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केलेला असतानाही भाजपचे असलेले महापौर बाबासाहेब वाकळे यांनी राष्ट्रवादीचे गटनेते असलेले संपत बारस्कर यांची नियुक्ती विरोधी पक्षनेतेपदावर केली. बारस्कर यांनी पदभार स्वीकारताच बोल्हेगाव-गणेश चौक रस्त्याचा विषय उपस्थित करून याची चौकशी करण्याची मागणी केली.

शिवसेनेने या रस्त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी तसेच इतर तक्रारींसाठी मध्यंतरी आंदोलन केले, त्यावेळी त्यांना कोणीही साथ दिली नाही. उलट शिवसेनेच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता मात्र अचानक चमत्कार झाल्यासारखा राष्ट्रवादीने रस्त्याच्या चौकशीची मागणी केली.

राष्ट्रवादीने आपला मुद्दा उचलल्याचे लक्षात येताच शिवसेनेने आज पत्रकार परिषद घेऊन याच रस्त्याच्या चौकशीची मागणी केली. हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून संबंधित ठेकेदारावर आणि अधिकार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करत, तसे न झाल्यास पंधरा दिवसांनंतर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांनी दिला. दरम्यान नगर शहराला पूर्णवेळ आयुक्त व जिल्ह्याला जिल्हा पोलीस अधीक्षक दिला पाहिजे. यासाठी आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अशोक बडे, मदन आढाव, अक्षय कातोरे यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राठोड म्हणाले, वेळोवेळी यासंदर्भात आम्ही पत्र देऊनही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. वास्तविक पाहता संबंधित ठेकेदारावर कारवाई करायला पाहिजे होती. त्याला काळ्या यादीत टाकायला पाहिजे होते. मात्र ते झाले नाही. ज्या वेळेला आम्ही आंदोलन केले, त्यावेळेला आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आता जर हे निकृष्ट दर्जाचे काम झाले असेल तर संबंधितांवर गुन्हे का दाखल होत नाहीत? या सर्व प्रकरणाची तत्काळ चौकशी केली पाहिजे.

आढाव म्हणाले, हा रस्ता तयार करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ही जनतेची फसवणूक आहे. हा रस्ता चांगला व्हावा यासाठी आम्ही अनेक वेळा निवेदन दिले होते. आता या रस्त्यावरील गज उघडे पडले असल्याने व रस्त्यावर मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाकण्यासाठी संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली फक्त सिमेंटचे पाणी ओतून उघडे पडलेले खड्डे व गज बुजविण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

ठेकेदाराकडून शासनाची लूट करण्यात आलेली आहे. या कामाची निष्पक्षपणे चौकशी करून ठेकेदार, इंजिनीयर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात येईल.

या भागातील नगरसेवक बडे म्हणाले, नगर शहरातील बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक या रस्त्याचे काम चार महिन्यांपूर्वी ठेकेदारामार्फत झाले होते. अत्यंत नित्कृष्ट स्वरुपाचे साहित्य वापरल्यामुळे हा रस्ता लगेचच खराब झाला आहे. या रस्त्यासाठी शिवसेनेने मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी आमच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. हे आंदोलन झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने तात्पुरती दुरुस्ती करून कामचलाऊ पद्धतीने काम पूर्ण केले. हा रस्ता अवघ्या चार महिन्यांतच पूर्णपणे उखडला गेला आहे. यामुळे वाहनांचे अत्यंत नुकसान होत आहे.

ठेकेदारांपेक्षा अधिकार्‍यांवर रोष जास्त
शिवसेनेने या रस्त्याच्या मागणीसाठी यापूर्वी आंदोलन केले होते. आताही त्यांनी हा मुद्दा उचलला आहे. मात्र त्यांचा रोष ठेकेदारावर जेवढा आहे, त्यापेक्षा अधिक अधिकार्‍यांवर विशेषतः अभियंत्यांवर आहे. मध्यंतरी एका प्रकरणात शिवसेनेते उपनेते राठोड यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याची फिर्याद देणारे त्यावेळचे शहर अभियंता होते. त्यामुळेच त्यांचा रोष अभियंत्यांवर जास्त असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या