शिवसेना पक्षांतर्गत उफाळलेला वाद मंत्र्यांच्या दारात
Featured

शिवसेना पक्षांतर्गत उफाळलेला वाद मंत्र्यांच्या दारात

Sarvmat Digital

शशिकांत गाडे-अनिल शिंदेंनी घेतली मंत्री एकनाथ शिंदेंची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आता नगरमध्येही सुरू होण्याच्या वाटेवर आहे. महाविकास आघाडीवरून नगर शहर शिवसेनेतील फुटीवर डीपीसीच्या निवडणुकीत शिक्कामोर्तब झाले. महाविकास आघाडीचे समर्थन करणारे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे आणि नगरसेवक अनिल शिंदे यांनी मुंबईत धाव घेत मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पक्षांतर्गत राजकीय गटबाजी अन् महापालिकेतील राजकीय समीकरणे या भेटीत मंत्री शिंदे यांना गाडे-शिंदे जोडगोळीने कथन केल्याचे सूत्रांकडून समजले.

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा पराभव झाल्यानंतर पहिलीच डीपीसीची निवडणूक लागली. शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेसनेही मदत केल्याचे निकालातून समोर आले. याच निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात अनिल राठोड यांच्या संमतीने शिवसेनेने उमेदवार दिले. त्यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीला राठोड यांचा विरोध असल्याचे यातून समोर आले.

या राजकीय घडामोडीनंतर सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जयंत वाघ यांना सोबत घेत अनिल शिंदे यांनी मुंबई गाठली. या तिघांनी सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत नगरसेवक शिंदे यांनी नगर शहरातील शिवसेनांतर्गत गटबाजी आणि महापालिका राजकारणाची स्थिती मंत्री शिंदे यांच्यासमोर मांडल्याचे समजते. त्याचा तपशील मात्र समजू शकला नाही. बहुधा राठोड यांच्या विरोधातील गार्‍हाणी मांडली असावीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असूनही सेना विरोधी बाकावर बसली आहे. 14 नगरसेवक असतानाही राष्ट्रवादी-काँग्रेसच्या सपोर्टने भाजपने सत्ता काबीज केली. महापालिकेतही महाविकास आघाडीचा पॅर्टन राबून शिवसेना नगरसेवकांना सत्तेचा ‘लाभ’ द्यावा, यासंदर्भातही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

नेतृत्व बदलाचे वारे ?
अनिल राठोड यांच्याकडे शहरात कोणतेच सत्ता केंद्र नाही. संघटनेवर मात्र त्यांचे अजूनही वर्चस्व आहे. शहर प्रमुख दिलीप सातपुते हे राठोड यांचे खंदे समर्थक आहेत. महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवकही अनिल राठोड यांचे आदेश न पाळता नेतृत्वालाच आव्हान देत असल्याचे निकालातून समोर आले. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. भेटीत नेमकं काय शिजलं याचा आदमास नगरकरांनाही आता आलाय. त्यामुळे आगामी काळात काही फेरबदल होतात की कसं याची उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com