Thursday, April 25, 2024
Homeनगरशिवरायांचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी अन् हाती भगवे ध्वज

शिवरायांचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी अन् हाती भगवे ध्वज

श्रीरामपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जय जिजाऊ, जय शिवराय असा जयघोष आणि फटाक्यांची आतषबाजी, पायघड्या रांगोळीने स्वागत व भगवे ध्वज हाती घेऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या श्रीरामपुरातील शिस्तबद्ध शिवजयंती मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलासराव जाधव व शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष किशोर निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मिरवणुकीला शहरातील व ग्रामीण भागातील महिला, पुरुष व युवकांचा लक्षणीय सहभाग होता.

- Advertisement -

शिवजयंती निमित्ताने मराठा समाज प्रतिष्ठानच्या वतीने थत्ते मैदान येथून मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे, आ. लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, देविदास चव्हाण, नारायणराव डावखर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, अशोक कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, शहरातील व ग्रामीण भागातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या अश्वरथात विराजमान झालेल्या राजदीप विलासराव जाधव व राजमाता जिजाऊंची वेशभूषा केलेल्या मंगलताई बाळासाहेब नवले आणि सोबत असलेले मावळे यांच्या जिवंत देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले.

डोलीबाजा, लेझीम पथक, हलगी, डफ, संबळ, जय जगदंब ढोल पथकासह विविध पारंपरिक वाद्यांसह बेलापूर रोड, शहीद भगतसिंग चौक, गिरमे चौकातून श्रीरामपूर नगरपरिषद, शिवाजी चौक, मेन रोड, सिद्धिविनायक मंदिर मार्गे थत्ते मैदानावर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. श्रीराम मंदिर चौकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचा अविस्मरणीय प्रसंग शिवप्रेमींना पाहण्यास मिळाला.

विशेष म्हणजे तुकाराम महाराजांची वेशभूषा श्रीमती अंजनाबाई गांगड यांनी साकारली होती. या मिरवणुकीसाठी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांनी अतिशय चांगला बंदोबस्त ठेवल्यामुळे रहदारीचा कोठेही त्रास जाणवला नाही. श्रीरामपूर नगरपरिषद, अशोक साखर कारखाना, ग्रामीण रुग्णालय यांचेही सहकार्य लाभले. शिवजयंती मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी मराठा प्रतिष्ठान महिला समिती, मराठा वधुवर सुचक मंडळ, मराठा युवा ग्रुप, मराठा फार्मर्स, मराठा उद्योजक, मराठा केमिस्ट ग्रुप आदींसह अन्य शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.

स्वामी समर्थ डेकोरेटर्सचे अविनाश पटारे यांनी विनामूल्य उभारलेल्या राजवाडा सेट व प्रवेशद्वारामुळे शिवप्रेमी उत्साहित झाले होते. तर स्टेजसमोर पुणे येथील श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनची प्रज्ञा सातपुते, शिर्डीचे भरत विसपुते यांची शिष्य कलावती देशमुख व कवडे क्लासेसच्या संचालिका ज्योती कवडे यांनी संयुक्तपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अप्रतीम व्यक्ती चित्रणाने सर्वांनाच मोहीत करुन टाकले. तसेच या तीन महिला कलाकारांनी सुशील शेळके व विशाल शेळके यांच्या मदतीने शहरातील चौकांमध्ये मिरवणुकीसमोर पायघड्या घालून रांगोळी काढल्याने सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या